देऊरच्या तरुणाची गळफासाने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 07:48 PM2019-02-15T19:48:17+5:302019-02-15T19:49:11+5:30
नैराश्य भावना : दोघांविरुध्द गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नोकरी लागणार नाही या नैराश्य भावनेतून तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना बुधवारी सकाळी धुळे तालुक्यातील देऊर गावात घडली़ याप्रकरणी त्याच्या भावाने दिलेल्या दिलेल्या फिर्यादीवरुन दोघा संशयितांविरुध्द पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली़
कल्पेश उर्फ भूषण शंकर उर्फ गिरधर देवरे आणि त्याच्या मित्राविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली म्हणून आपल्याला नोकरी लागणार नाही, अशी नैराश्याची भावना कल्पेशच्या मनात होती़ त्यातून त्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज त्याचा भाऊ चेतन याने व्यक्त केला आहे़
धुळे तालुक्यातील देऊर गावाच्या शिवारात भटू माधवराव देवरे यांच्या शेतातील गोठ्यात असणाºया गायीचे पाय बांधण्याचे दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही दुर्घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे देवरे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला़
याप्रकरणी कल्पेश याचा भाऊ चेतन देवरे याने धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, हेमांगी दिगंबर देवरे आणि विजय तुळशिराम देवरे (रा़ देऊर बुद्रुक ता़ धुळे) या दोघा संशयितांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला़ पोलीस उपनिरीक्षक आऱ टी़ गवई घटनेचा तपास करीत आहेत़ या दोघा संशयितांना अटक झालेली नाही़ तपास सुरु आहे़