सिंचन विहीर अनुदानासाठी शेतकरी कुटुंबाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:36 PM2019-07-22T13:36:11+5:302019-07-22T13:36:39+5:30

कुटुंबातील सदस्यांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

Suicides attempt by farmer family to poison for irrigation well | सिंचन विहीर अनुदानासाठी शेतकरी कुटुंबाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

सिंचन विहीर अनुदानासाठी शेतकरी कुटुंबाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

Next


मालपूर, ता.शिंदखेडा : सिंचन विहिरीच्या अनुदानासाठी शेतात खोदकाम सुरू असलेल्या विहिरीजवळच येथील शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. दोंडाईचा व नंदुरबार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कुटुंबातील सदस्यांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे.
शेतकरी प्रकाश पोपट धनगर यांना त्यांच्या गट क्र. ८३/१/३ मध्ये १.३५ आर क्षेत्र असलेल्या शेतात सिंचन विहीर मंजूर झाली असून शिंदखेडा पंचायत समितीच्या अभियंत्याकडून आखणी करून खोदकामही झाले आहे. सर्व अटींचे पालन करूनही कोणतेही अनुदान बॅँक खात्यात जमा न झाल्याने या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यापूर्वीही १ एप्रिल रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्नीसह अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्यासतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला होता. मात्र त्यानंतरही न्याय न मिळाल्याने त्यांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले.
मोयाणे शिवार हे नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार जितेंद्र जाधव, हवालदार संजय मोरे, बापू बागुल, विजय सोनवणे तसेच महिला पोलीस नाईक सुमन पाडवी व दोंडाईचा पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल प्रमोद चौधरी, कॉन्स्टेबल योगेश पाटील, मोहन पाटील, वैंदाणेचे पोलीस पाटील जगदीश पाटील हे सर्व शेतकरी धनगर यांच्या शेतातील विहिरीजवळ ठाण मांडून बसले होते.
धनगर हे पत्नी योगिताबाई धनगर, मुलगा भूषण धनगर व निखिल धनगर यांच्यासह सोमवारी त्यांच्या शेतातील विहिरीजवळ पोहचले त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. पोलिसांकडे कोणतेही वाहन नसल्याने सुमारे तासभर हे कुटुंब रस्त्यावर पडून उलट्या करत होते. त्यामुळे त्यांचे कपडे रक्ताने माखले. घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. पोलिसांचे वाहन तासाभरानंतर पोहचले. त्यावेळी पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेऊन वाहनाने नंदुरबार येथे नेले. तेथील जिल्हा रूग्णालयात दाखल करताच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या शरीरातील विष बाहेर काढण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Suicides attempt by farmer family to poison for irrigation well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे