साक्रीत पाणीटंचाई आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:29 PM2018-11-30T22:29:42+5:302018-11-30T22:30:28+5:30

खासदार गावीतांनी घेतली बैठक : केवळ वेळकाढूपणा असल्याची बैठकीदरम्यान चर्चा

Summit water shortage review meeting | साक्रीत पाणीटंचाई आढावा बैठक

साक्रीत पाणीटंचाई आढावा बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : तालुक्यातील दुष्काळाच्या संदर्भात ५१९ गावांचा पाणीटंचाई आढावा शुक्रवार ३० रोजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मागच्या महिन्यात आमदार डी.एस. अहिरे यांनीही अशीच आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर खासदार हिना गावित यांनी ही दुसरी बैठक घेतली. बैठकीला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व इतर राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. 
टंचाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या बैठकीच्या संदर्भात आलेल्या सरपंचांमध्ये ही टंचाईची बैठक का वेळकाढू बैठक अशी चर्चा होती. 
या बैठकीमध्ये पाणीटंचाईचा विषय फक्त कागदोपत्री सांगितला जातो. परंतु प्रत्यक्षात यंत्रणा कुठलीही कार्यवाही करत नसल्याचे अनेक सरपंच यांनी यावेळी बोलून दाखवले. अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत किंवा अपूर्ण आहेत. अशा अपूर्ण योजनांच्या संदर्भात खासदार गावित यांनी त्यावेळेस चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर अशा कोणत्याही अपूर्ण पाणी पुरवठा योजना संदर्भात चौकशी झाली नाही आणि कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
ग्रामसेवक व नागरिकांच्या म्हणण्यानुसार दोन महिन्यापासून कनेक्शनसाठी आम्ही अर्ज दिला आहे परंतु अद्यापही आम्हाला कनेक्शन दिले गेले नसल्याचे सांगितले. यावर वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आमच्यापर्यंत असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे म्हटले आहे.  प्रतापपूरचे सरपंच ऋतुराज ठाकरे यांनीही तीन वर्षापूर्वी बैठकीत हीच तक्रार केली होती. त्यानंतर आमदारांनी घेतलेल्या बैठकीत यांनी पाणी पुरवठा योजना संदर्भात तक्रार केली आणि आजच्या बैठकीतही पुन्हा त्यांनी तक्रार केली असता खासदार हिना गावित यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना दिल्या. 
आजच्या बैठकीमध्ये सर्वात जास्त तक्रारी वीज वितरण कंपनीच्या संदर्भात होत्या. तर अनेक गावच्या सरपंच व ग्रामसेवकांनी विहीर खोलीकरण, अपूर्ण पाणीपुरवठा योजनांसंदर्भात सूचना केल्या.
संपूर्ण तालुक्याचा पाणी टंचाईचा आढावा सुरू असताना साक्री शहराच्या पाण्यासंदर्भात कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही किंवा टंचाई आढावा बैठकीत साक्री शहराच्या पाण्याचा विषय निघत नाही. यावर शिवसेनेचे पंकज मराठे यांनी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. परंतु नगरपंचायतचे कोणतेही अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. 
यासंदर्भात नगरपंचायत च्या अधिकाºयांना या बैठकीविषयी कळविण्यात आले नसल्याचे पुढे आले. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेसाठी विद्युत कनेक्शन व ट्रांसफार्मरची गरज असेल तिथे ताबडतोब ट्रांसफार्मर बसवण्याचे आदेश खासदार हिना गावित यांनी संबंधित अधिकाºयांना दिले आहेत. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात वीज पोहोचवण्यासाठी वीज वितरण कंपनीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असेही आदेश त्यांनी दिले. 
पाणी टंचाई आढावा बैठक चार वाजेपर्यंत सुरू होती. त्यात निम्मे गावांचा आढावा बाकी असल्याने बैठकीत ब्रेक घ्यावा लागला व पुन्हा अर्ध्या तासाने बैठक घेण्यात      आली.
सदर आढावा बैठक बालआनंद नगरी येथे घेण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते. पं.स. सभापती गणपत चौरे, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष विलासराव बिरारीस, जि.प. सदस्य लिलाबाई सूर्यवंशी, दिलीप काकुस्ते रमेश सरक, पं.स. सदस्य युवराज काकुस्ते, वसंतराव बच्छाव, भाजपा तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, पाणीपुरवठा विभागाचे अजय पाटील जि.प. सदस्य विजय ठाकरे, महावितरणचे रवींद्र घोलप, पाणीपुरवठा विभागाचे तसेच पाटबंधारे विभागाचे उपअभियंता व अभियंता यावेळी उपस्थित होते.
निमंत्रणावरुन सरपंचांची नाराजी; खासदारांच्या सूचना
४खासदार हिना गावित यांनी घेतलेल्या बैठकीचे निमंत्रण ग्रामसेवकांमार्फत मिळाल्याने तालुक्यातील सर्व सरपंचांनी नाराजी व्यक्त केली. सरपंचांना काही मानसन्मान आहे का नाही? अशी विचारणा धमणारचे सरपंच छोटू सोनवणे यांनी खासदारांकडे केली. यावर खासदारांनी तीव्र नापसंती व्यक्त करत तहसीलदार यांना जाब विचारला व यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा दम भरला यापुढे सर्व सरपंचांना मानसन्मानाने निमंत्रण देऊन त्यांचा सन्मान राखला जावा, अशी सूचनाही खासदारांनी केली.
४तीन वर्षापूर्वी अशीच एक मॅरेथॉन बैठक खासदार हिना गावित यांनी घेतली होती, ती पहिलीच बैठक असल्याकारणाने तालुक्यातील जनतेत प्रचंड औत्सुक्य होते. या बैठकीत अनेक पाणीपुरवठा योजना संदर्भात सरपंचाने तक्रारीही केल्या होत्या. त्यानंतर या घटनेला तीन वर्षे उलटल्यावरही पाणीटंचाईची परिस्थिती आजही प्रत्येक गावांमध्ये सारखीच आहे. 
४दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा किती गंभीरतेने पाहते याविषयी या बैठकीत काही उदाहरणे पाहायला मिळाली. त्यात आदिवासी भागातील व दहीवेल जवळच्या बोडकीखडी येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण आहे. परंतु दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीने कनेक्शन दिले नसल्याची तक्रार तेथील ग्रामसेवकाने बैठकीत केली असता यावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.

Web Title: Summit water shortage review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे