अंधश्रध्दा निर्मुलन समितीतर्फे शिंदखेड्यात शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 10:19 PM2018-06-03T22:19:35+5:302018-06-03T22:19:35+5:30
वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचा प्रयत्न : अविनाश पाटील यांचे विचार, शिबिराचा आज समारोप
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : समाजामध्ये असलेला अंधश्रध्देचा विळखा मानवी जीवनाचे नुकसान करतो व विकासातील अडथळा असल्याचे सांगून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचे काम हाती घेतले आहे. संघटना समाजातील जाचक रूढी परंपरांना पर्याय देत असून या पयार्यांना देखील समाज सकारात्मकतेने स्विकारत असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात आयोजित दोन दिवसीय धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या संघटना संवाद कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या प्रसंगी अंनिसचे राज्य उपाध्यक्ष डॉ. रविंद्र टोणगांवकर, शिंदखेडा शाखेचे अध्यक्ष मनोहर भोजवाणी, विनायक सावळे, सुनील स्वामी, अशोक शाह हे व्यासपिठावर उपस्थित होते़ सदर प्रशिक्षणात धुळे, निमगुळ, शिरपूर, शिंदखेडा, पिंपळनेर, नंदुरबार, शहादा, तळोदा, कलंबू आदी शाखेतून सुमारे ६० कार्यकर्ते उपस्थित होते़
अविनाश पाटील म्हणाले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही समाजामध्ये लक्षवेधी संघटना आहे. प्रवाहाच्या विरोधात काम करणारी संघटना आहे. प्रवाहाच्या विरोधात जावून काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका ही चळवळीच्या भूमिकेशी सुसंगत असावी़ संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना कार्यक्षमता सिद्ध करावी लागेल़ त्यासाठीच राज्य पातळीवर संघटना संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. राज्यात आतापर्यंत अकरा जिल्ह्यांमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.
डॉ. रविंद्र टोणगांवकर यांनी प्रशिक्षण शिबीरातून कार्यकर्त्यांना कामाची नवी उमेद व दिशा मिळत असल्याचे सांगितले़ अंनिस ही विधायक संघटना असून संघटनेचे काम अधिक जोमाने होण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे महत्वाची आहेत़ कार्यकर्त्यांनी या शिबिरातून स्वत:ला अपग्रेड करावे, असे आवाहनही डॉ़ टोणगावकर यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. दीपक माळी, भिका पाटील, प्रा. परेश शाह, प्रा अजय बोरदे, प्रा.संदिप गिरासे हे परीश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रा.परेश शाह यांनी मानले़ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़