लॉकडाउनमुळे टेलरिंग व्यवसाय अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:01 PM2020-05-11T22:01:20+5:302020-05-11T22:01:43+5:30
शिरपूर : कारागिरांवर ओढावली उपासमारीची वेळ, तालुक्यातील शेकडो हात रिकामेच
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : लॉकडाऊनमुळे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून शहरी व ग्रामीण भागातील सर्वच व्यवसाय ठप्प पडले आहेत़ त्यात टेलरिंग व्यवसायावर अवकळा आली असून ग्रामीण कारागिरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे़
शहर व ग्रामीण भागत प्रत्येक गावी टेलरिंगचा व्यवसाय सुरू आहे़ शहरी भागातील टेलरिंग व्यावसायिक सुस्थितीत असतात़ मात्र ग्रामीण भागातील टेलरिंग व्यवसाय जेमतेम चालतो़ प्रत्येक गावात टेलर म्हणून अनेक नागरिक काम करतात़ लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसायही ठप्प झाला आहे़ परिणामी तालुक्यातील शेकडो टेलरिंग कारागिरांचे कुटुंब संकटात सापडले आहे़ संचारबंदीमुळे या व्यावसायिकांना दुसरा कोणताही व्यवसाय करता येत नाही़ त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे़ तालुक्यात जवळपास २५० ते ३०० टेलर आहेत़ बहुतांशी जणांकडे चांगल्याप्रकारे कारागिर आहेत़
ऐन लग्नसराईत ओढवली गदा ़़़
मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांमध्ये लग्नसराईची लगबग असते़ या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात टेलर व्यावसायिकांना काम मिळते़ मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने हा हंगाम वाया गेला आहे़ पुढील महिन्यात पावसाळा लागणार आहे़ त्यामुळे टेलरिंगचे काम मोजकेच मिळणार आहे़ हंगामातील महत्वाचे तीन महिने वाया गेल्याने टेलर व त्यांच्या दुकानातील कारागिरांवर संक्रांत ओढवली आहे़