तीन तासात हटवली २५ अतिक्रमणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:12 AM2017-07-30T01:12:43+5:302017-07-30T01:13:48+5:30
नवीन इमारत : तहसील कार्यालय कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नूतन तहसील कार्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. या कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कच्ची व पक्की अतिक्रमणे झाली होती, ती महसूलच्या आदेशान्वये पालिकेने शनिवारी जमीनदोस्त केली. २५ पेक्षा अधिक अतिक्रमणे तीन तासात काढण्यात आली. पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी या ठिकाण कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे.
शहरात निझर रस्त्यावर मिशन कंपाऊंडच्या समोर नव्याने तहसील कार्यालयाची इमारत उभारण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु, त्यासाठी मुहूर्त सापडत नसल्यामुळे आहे, त्या स्थितीत या ठिकाणी तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची पूर्वतयारी करण्यात येत आहे. या ठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्याची पहिली प्रक्रिया शनिवारी पार पाडण्यात आली. २५ पेक्षा अधिक अतिक्रमणे या ठिकाणाहून काढण्यात आली.
सुरुवातीपासून अतिक्रमण
या ठिकाणी जिल्हा निर्मितीपूर्वी प्रांताधिकाºयांचे निवासस्थान होते. जिल्हा निर्मिती झाल्यानंतर ते निवासस्थान काही बदल करून जिल्हाधिकाºयांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हाधिकाºयांचे अधिकृत शासकीय निवासस्थान नवापूर रस्त्यावर बांधण्यात आल्यानंतर, त्या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकाºयांचे निवासस्थान झाले. अपर जिल्हाधिकाºयांनाही अधिकृत शासकीय नवीन निवास्थान मिळाल्यानंतर, हे निवासस्थान तब्बल तीन वर्ष पडीक होते, त्यानंतर ही जागा विविध बाबींसाठी मागणी करण्यात आली. अखेर तालुका प्रशासकीय इमारतीसाठी ही जागा अधिग्रहित करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यात आले, तीन वर्षांपासून हे बांधकाम सुरू होते. अखेर सहा महिन्यांपूर्वी ते पूर्ण करण्यात आले. त्यामुळे सुरुवातीपासूनच या ठिकाणी कच्चे व पक्के अतिक्रमण करण्यात आले होते.
कच्ची व पक्की अतिक्रमणे
तहसील कार्यालयाच्या कुंपणाच्या भिंतीला लागून रस्त्यालगत अनेकांनी विविध व्यवसाय थाटले होते. ज्या वेळी तहसीलची इमारत बांधकाम सुरू झाले, त्या वेळी अनेकांनी जागा सांभाळण्यासाठी कसरत केली, त्यातून दोन ते तीन वेळा हाणामारीदेखील झाली. या ठिकाणी खाद्य पदार्थ विक्रेते, शीतपेय विक्रेते, अंडापाव लॉरी, झेरॉक्स सेंटर यासह मोबाइल सीम विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. त्यासाठी लोखंडी टपरी, कच्चे बांधकाम करण्यात आले होते. परिणामी सायंकाळी या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी राहत होती. रहदारीला देखील अडथळा निर्माण होत होता. तहसील कार्यालय सुरू झाल्यावर या ठिकाणी या अतिक्रमणाचा मोठा त्रास सर्वसामान्यांसह कर्मचाºयांनाही झाला असता. ही बाब लक्षात घेऊन महसूल विभागाने पालिकेला या भागातील सर्वच अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.
कामकाजाला लवकरच सुरुवात
तहसील कार्यालयाचे संपूर्ण कामकाज लवकरच या नवीन इमारतीत सुरू होणार आहे, त्यासाठी एकएका विभागाचे दप्तर व सामान स्थलांतरित करण्यात येत आहे. १ आॅगस्ट किंवा १५ आॅगस्टचा मुहूर्त राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुख्यमंत्री किंवा महसूलमंत्री महिनाभरात जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी कामकाज सुरू करण्यात येणार आहे.
सध्याच्या इमारतीत अनेक समस्या आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इमारत ठिकठिकाण गळत आहे. परिणामी अधिकारी व कर्मचाºयांनादेखील बसण्यासाठी पुरेशी सोय राहत नाही. शिवाय रेकॉर्डदेखील खराब होण्याची शक्यता आहे.
बसस्थानक व रेल्वेस्थानकापासून लांब अंतरावर ही इमारत राहणार असल्यामुळे ग्रामीण भागातून येणाºयांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यासाठी वेळ व पैसाही खर्च होणार आहे.