महिला सक्षमीकरणासाठी ‘माविम’ची मदत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 10:10 PM2020-09-09T22:10:36+5:302020-09-09T22:10:59+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक : महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा ज्योती ठाकरे यांचे निर्देश

Take the help of ‘Mavim’ for women empowerment | महिला सक्षमीकरणासाठी ‘माविम’ची मदत घ्या

dhule

Next

धुळे : महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात. या योजना महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी या विभागांनी महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य घ्यावे, असे निर्देश महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.
माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे दोन दिवस धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक मनोजकुमार दास, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गो. नि. शिंपी, माविमचे विभागीय मूल्यमापन अधिकारी संदीप मराठे, जिल्हा समन्वय अधिकारी हेमंत भदाणे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
महिला आर्थिक विकास महामंडळ ही महिलांसाठी कार्य करणारी शिखर संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९७५ मध्ये झाली असून देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही माविमचे अध्यक्षपद भूषविले आहे. माविमच्या माध्यमातून राज्यात ४३१ लोकसंचलित साधन केंद्र चालविले जातात. प्रत्येक केंद्राशी ४५० ते ५०० महिला बचत गट जोडले गेले आहेत. या माध्यमातून १६ लाख महिला माविमशी जोडल्या गेल्या आहेत. कोरोना काळात या महिलांनी प्रत्येकी एक रुपयाप्रमाणे ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली आहे. माविमच्या माध्यमातून बचत गटांना चार हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले असून त्याचा ९९.५ टक्के परतावा आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला होता. या कालावधीत धुळे जिल्ह्याने राज्याला दिलेल्या धान्य बँकेचा लाभ झाला. याच धर्तीवर व्हेजिटेबल बँक सुरू करण्याचा मनोदय आहे. तसेच अमरावती, अकोला, पालघर जिल्ह्यात गोट बँकेचा उपक्रम पथदर्शी म्हणून राबविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी महिलांसाठी असलेल्या विविध योजना माविमच्या माध्यमातून राबवाव्यात. त्यामुळे महिलांसाठी असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. त्यासाठी माविमच्या जिल्हा कार्यालयाने दहा दिवसांत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश ठाकरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी संजय यादव म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतानाच राज्य शासनाने मिशन बिगेन अगेन सुरू केले आहे. आता ‘माझी जबाबदारी- माझे कुटुंब’ ही मोहीम सुरू केली आहे. अशा परिस्थितीत समाजाचे सक्षमीकरण होण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. ते करतानाच त्यांना स्वावलंबी करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसून येतील. धुळे जिल्ह्यात माविमच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्यात येईल. शासकीय योजनांचा लाभ देताना गावनिहाय प्राधान्य असेल. कोरोना सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी न्यूट्री गार्डन, पसरबागेचा उपयोग होईल. स्कील गॅप शोधून त्याच्या प्रशिक्षणाचेही नियोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागूल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिंपी आदींनी आपापल्या विभागामार्फत महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. माविमचे जिल्हा समन्वयक भदाणे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती दिली.

Web Title: Take the help of ‘Mavim’ for women empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे