घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:19 PM2019-07-13T12:19:05+5:302019-07-13T12:20:45+5:30

भावभक्तीचा जागर : आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी रीघ, पालखी व दिंडी सोहळ्यांत अपूर्व उत्साह

Take my pick, sweet name Vithoba | घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे 

धुळे येथील मालेगावरोडवरील मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी पुरुष-महिला भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी शहर व जिल्ह्यात पहाटेपासून अपूर्व उत्साह पहावयास मिळाला. जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ दे, असे साकडे विठ्ठल-रुखमाई यांना घालण्यात आले. दर्शनासाठी त्या-त्या मंदिरांच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. पुरुष-महिला भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. यानिमित्त काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यांमध्ये आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शाळांमधूनही विविध कार्यक्रम पार पडले. 
यानिमित्त गेल्या आठवड्यात विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर अभिषेक पूजा, काकड आरती, भजन, महापूजा, ग्रंथवाचन, दिंडी सोहळा, पालखी मिरवणूक, हरिपाठ प्रवचन, भजनसंध्या, मंत्रोच्चार जप, कीर्तन सप्ताह असे विविध कार्यक्रम पार पडले. त्यातील बºयाच कार्यक्रमांची शुक्रवारी सांगता झाली.   
धुळे शहरात यात्रोत्सव 
शहरातील मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिर परिसरात यानिमित्त परंपरेनुसार यात्रा भरली. दर्शनासाठी होणाºया गर्दीमुळे पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासून लागलेल्या रांगा नागरिक येत गेल्याने संध्याकाळपर्यंत कायम होत्या. यात्रेनिमित्त आलेले पाळणे, व्यावसायिकांनी थाटलेले विविध वस्तू-साहित्य विक्रीचे स्टॉल यामुळे उत्साहाचे वातावरण होते. या निमित्त मालेगाव रोडवरील वाहतूक वळविण्यात आली होती. गर्दीमुळे काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. 
बाळदेत नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल यांच्याहस्ते पूजा
प्रति पंढरपूर  बाळदे येथील पांडूरंगाच्या मंदिरात नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्याहस्ते पूजा करण्यात आली़ यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार काशिराम पावरा, रिता पटेल, कक्कुबेन पटेल, माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, तहसीलदार चंद्रशेखर देशमुख, आमदार पटेल यांचे स्वीय सचिव अशोक कलाल, भाजपा तालुका प्रभारी डॉ़जितेंद्र ठाकूर, शिसाकाचे संचालक डिगंबर पांडू माळी, जि़प़सदस्य जितेंद्र पाटील, सरपंच उज्वला निलेश पाटील, मुख्याध्यापक मनोहर पाटील, निलेश पाटील आदी उपस्थित होते़ 
यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर अभिषेक पूजा, काकड आरती, भजन, महापूजा, ग्रंथवाचन, दिंडी सोहळा, पालखी मिरवणूक आदी विविध कार्यक्रम झाले. रात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी रीघ कायम होती. 
*भाविकांची अलोट गर्दी *
पिंपळनेर येथे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. त्यात आबालवृद्धांचा समावेश होता. पोलीस कर्मचाºयांना तैनात करण्यात आले होते.  
*मंदीर परिसर गर्दीने फुलले *
दोंडाईचा येथे आषाढीनिमित्त मंदिरांसह उत्सवमूर्ती सजविण्यात आल्या होत्या. सकाळपासून भाविकांनी मोठ्या संख्येने विठुरायाचे दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. रात्री भजन, कीर्तनादी कार्यक्रम संपन्न झाले. 
*उपवासाच्या पदार्थांना मागणी 
आषाढी एकादशीच्या उपवासामुळे सर्वत्र फराळाच्या पदार्थांना मागणी होती. भाविकांना विविध संस्था, संघटना व मंडळांतर्फे साबुदाण्याची खिचडी, केळी, वेफर्स, शेंगदाण्याची चिक्की, भगर-आमटी अशा विविध पदार्थांचे वाटप करण्यात आले. जिल्हाभरात विविध ठिकाणी असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. 

 

 

Web Title: Take my pick, sweet name Vithoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे