धुळ्यात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लांबविली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 05:34 PM2023-04-21T17:34:51+5:302023-04-21T17:35:54+5:30
सण आणि उत्सवामुळे धुळ्यातील बसस्थानकात सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हातसफाई करीत असल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.
राजेंद्र शर्मा
धुळे : गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरट्याने लांबविली. ही घटना धुळे बसस्थानकात मंगळवारी दुपारी घडली. बस नंदुरबारच्या दिशेने रवाना झाल्यानंतर दत्त मंदिर चौकात ही घटना महिलेच्या लक्षात आली. याप्रकरणी गुरुवारी रात्री देवपूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सण आणि उत्सवामुळे धुळ्यातील बसस्थानकात सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हातसफाई करीत असल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.
दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास गर्दी होती. ही संधी चोरट्याने साधली. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन पुष्पा दिलीप वाघ (वय ५०, रा. रामदेव बाबा नगर, कोकणी हील, नंदुरबार) या महिलेच्या हातातील २० ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरट्याने लांबविली. सुरुवातीला ही बाब पुष्पा वाघ यांच्या लक्षात आली नाही. ज्यावेळेस बस नंदुरबारच्या दिशेने निघाली, दत्त मंदिराजवळ आल्यानंतर वाहकाने तिकिटाचे पैसे मागितले त्यावेळेस हातात बांगडी नसल्याचे लक्षात आले. त्यावेळेस चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही.
महिला नंदुरबार येथे निघून गेली. नंतर पुन्हा ही महिला गुरुवारी सकाळी धुळ्यात दाखल झाली. तिने शहर पोलिस ठाण्यात जाऊन चोरीची फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण ही घटना देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लक्षात आल्यामुळे या महिलेला देवपूर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. त्यानुसार, रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचा तपास पोलिस नाईक टी. एन. पाटील करीत आहेत.