कापडण्यात शिक्षकाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:45 PM2018-03-10T22:45:30+5:302018-03-10T22:45:30+5:30
कॉपी करण्यास विरोध : दोन गट आमने-सामने, तणावाची स्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील कापडणे येथील बोरसे विद्यालयात दहावीची परीक्षा सुरु आहे़ बाहेरील काही तरुण परीक्षा केंद्रात आल्याने त्यांना देवभाणेचे येथील शिक्षक भटू चुनीलाल देसले यांनी रोखले़ त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक वाद झाला़ या घटनेनंतर काही तरुणांनी शनिवारी दुपारी एकत्र येऊन धुडगूस घालत त्या शिक्षकास धक्काबुक्की केली़ या प्रकारामुळे परीक्षा केंद्र आणि केंद्राबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ घटनेचे वृत्त कळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला़
कापडणे येथील बोरसे विद्यालयात दहावीचा बीजगणिताचा पेपर सकाळी ११ वाजता सुरु असतांना योगेश्वर माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक तथा पर्यवेक्षक भटू चुनिलाल देसले यांनी वर्गात पेपर सुरू होण्याआधी काही मिनिटे अगोदर नुकत्याच उत्तरपत्रिका वाटप केल्या होत्या. प्रश्नपत्रिका वाटप होण्याअगोदर या वर्गात काही बाहेरील तरूणांनी अनधिकृत प्रवेश केला़ वर्गातील विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकांना नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. यावेळेस वर्गातील पर्यवेक्षक भटू देसले यांनी या तरूणांना वर्गातून हुसकाविण्याचा प्रयत्न केला़ त्याचा राग तरुणांना आला़ यावेळी शिक्षक आणि त्या तरुणांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
शिक्षकास धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरून त्याचा राग करीत काही तरुण वाहनाने कापडण्यात दाखल झाले़ त्यांच्या हातात विविध प्रकारचे शस्त्रास्त्र होती़ तणाव निर्माण झाल्याने दोन गट आमने सामने आल्याने दोघांमध्ये धुमश्चक्री उडाली़ वातावरण अधिकच गंभीर होत असल्याने भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले़ नवीन दरवाजा चौकात पाऊण तास भांडण सुरु होते. नदी चौकातील व्यावसायिकांनी आपले दुकाने लागलीच बंद केली होती़ गावात तणावाची स्थिती कायम आहे़ दरम्यान, या प्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशनला सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.