व्यसनापासून युवकांना परावृत्त करण्याचे कौशल्य शिक्षकांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:55 AM2018-12-24T11:55:51+5:302018-12-24T11:56:58+5:30
एस.डी. पाटील : कुडाशीत मुख्याध्यापकांचा मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : शिक्षक हा कीर्तनकार नाही तो परिवर्तनकार आहे. परिवर्तन ही सध्या समाजाची गरज आहे. देशातील सर्वात मोठी शक्ती युवाशक्ती असून ती जर व्यसनात गुरफटली तर भावी पिढीला नुकसान पोहचण्याचा धोका असून त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचे कार्य शिक्षकच प्रभावीपणे करू शकतो, असे समुपदेशक प्रा.एस.डी. पाटील यांनी सांगितले.
सलाम मुंबई फाउंडेशन व कुडाशी देवलीपाडा केंद्र शाळेंतर्गत येणाºया प्राथमिक, माध्यमिक व आश्रमशाळा मुख्याध्यापकांचे प्रबोधन करण्यासाठी आयोजित उदबोधन वर्गात ते बोलत होते. त्यांच्य अध्यक्षतेत हा कार्यक्रम घेण्यात आला. व्यसनामुळे आरोग्याचे नुकसान होते, आयुष्य घटते. यामुळे तंबाखूमुक्त अभियानात सहभागी होऊन निकोप पिढी घडवू या, असे आवाहनही त्यांनी केले. युवकांना व्यसनापासून परावृत्त न केल्यास युवापिढीचे भविष्ट अंधकारमय होईल. तो धोका टाळण्यासाठी तंबाखूमुक्त पिढी घडविण्यासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन या अभियानाचे जिल्हा समन्वयक राजेंद्र माळी यांनी केले. व्यसनामुळे कर्करोग झाल्याची सेलिब्रिटींची उदाहरणे प्रास्ताविकात सांगून कार्यक्रमाचे संयोजक व केंद्रप्रमुख व्ही.जी. धनगर यांनी या विषयावर उपस्थित सर्वांनाच अंतर्मुख केले.