ज्ञानदानासाठी शिक्षकांचा ‘खडतर’ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:43 PM2018-09-05T12:43:07+5:302018-09-05T12:44:35+5:30

शिरपूर तालुक्यातील स्थिती, दुर्गम भागातील शाळेत पायीच जावे लागते

Teacher's 'tough' journey for knowledge | ज्ञानदानासाठी शिक्षकांचा ‘खडतर’ प्रवास

ज्ञानदानासाठी शिक्षकांचा ‘खडतर’ प्रवास

Next
ठळक मुद्देशिरपूर तालुक्यातील १४ शाळा अवघड क्षेत्रात शिक्षकांना मध्यप्रदेशातील गावे ओलांडून जावे लागते शाळेतअनेक शाळा झोपड्यांमध्येच भरतात.


आॅनलाइन लोकमत
धुळे/ शिरपूर : डोंगराळ, दºयाखोºयाचा भाग... धड रस्ता नाही...वाहनांची सुविधा नाहीच नाही.. काही ठिकाणी घनदाट जंगल.. अशा दुर्गम भागातील  शाळांमध्ये शिकवायला जायाचे म्हणजे शिक्षकांची कसरतच आहे. एवढेच नाही तर काही शिक्षकांना मध्यप्रदेशातील गावे ओलांडून शाळेत जावे लागते. मात्र हे शिक्षक ऊन, पाऊस, थंडी याची कसलीही तमा न बाळगता अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. ही स्थिती आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अवघड क्षेत्रातील जि.प.शाळांमधील. 
इंग्रजी असो अथवा काही मराठी शाळा, विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी थेट विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत वाहन पाठवून घेऊन येतात व सोडूनही देतात. ती स्थिती जिल्हा परिषदेच्या शाळांची नाही. मात्र दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळाले पाहिजे, या भावनेतून, जाणिवेतून जिल्हा परिषदेचे  अनेक शिक्षक खडतर प्रवास करून ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याचे आशादायक चित्र बघावयास मिळते. 
शिरपूर तालुक्यातील बहुतांश भाग हा पहाडी, दुर्गम आहे. तालुक्याला लागूनच मध्यप्रदेशाची सीमा आहे. अशा दुर्गम भागात जिल्हा परिषधेच्या शाळांशिवाय दुसरा पर्याय नाही.  या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १४ शाळा या अवघड क्षेत्रात आहे. या अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये जायाच म्हणजे, कसरतच करावी लागते. 
अवघड क्षेत्रातील काही शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी जायाला चांगला रस्ता नाही. पायी चालता येईल एवढीच पायवाट आहे. दुचाकीचा वापर फक्त उन्हाळ्यातच करता येऊ शकतो. अशा स्थितीत शाळेत जायाचे म्हणजे पायी जाण्याशिवाय पर्याय नसतो. असे असले तरी शिक्षकांना दररोज दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून, डोंगर चढ उतार करून, शाळेत शिकवायला जावे लागते. अशा अवघड स्थितीत हे शिक्षक आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत..
तालुक्यातील निशाणपाणी ही दोन शिक्षकी शाळा असून, याठिकाणी जवळपास ३४-३५ विद्यार्थी शिकायला आहेत. या शाळेत जाणाºया शिक्षकाला बिजासनी घाट ओलांडून मध्यप्रदेशातील खडकीयासह चार गावे ओलांडून तेथील जिल्हा परिषद शाळेत जावे लागते. मध्यप्रदेशाच्या सीमेपासून जवळपास तीन किलोमीटर अंतर दररोज पायी जावे लागते.  तीच स्थिती काकरमाळ या जि.प. शाळेची आहे. या शाळेत जाणाºया शिक्षकांनाही बिजासनी घाट ओलांडून मध्यप्रदेशातील जमानिया गाव ओलांडल्यानंतर दोन किलोमीटर पायी जावे लागते.  पाटवा ही जिल्हा परिषद शाळाही अती दुर्गम भागात आहे. या ठिकाणी जाण्यासाठी शेमल्या या गावापासून चार किलोमीटर अंतरापर्यंत शिक्षकांना दुचाकीनेच जावे लागते. शेखºयापाडा या ठिकाणी दुचाकी जाते मात्र दुचाकी चालविणे हे देखील जोखमीचेच काम आहे. कुंडीपाडा या शाळेत जाण्यासाठीही पदयात्राच करावी लागते. 
झोपडीतील 
शाळांमध्येही गुणवत्ता
शिरपूर तालुक्यातील कुटमळी, पीरपाणी, पिंपळ्यापाणी, टिटवापाणी, सातपाणी, न्यू सातपाणी, काईडुबकीपाडा या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा झोपडीमध्येच भरतात. मात्र या झोपडीमधील शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता उत्तम दर्जाची आहे. 
तसेच प्रधानदेवी, मालपूरपाडा, साकीपाडा, कुंड्यापाणी, या भागातील शाळाही जंगलात आहे. शिक्षकांना दोन-दोन किलोमीटर पायी जावे लागते. मात्र या शाळाही नियमित सुरू असतात. विशेष म्हणजे शिक्षकांसोबतच गटशिक्षणाधिकारी पी.झेड. रणदिवे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे, प्रतिभा शिसोदे, आर. के. गायकवाड यांच्यासारखे अधिकारीही या दुर्गम शाळांना वारंवार भेटी देऊन पहाणी करीत असतात. 

 

Web Title: Teacher's 'tough' journey for knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे