शिक्षकांमुळे विविध विषयांची आवड निर्माण झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:26 AM2019-09-05T11:26:02+5:302019-09-05T11:26:18+5:30
धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांची माहिती
अतुल जोशी।
आॅनलाइन लोकमत
धुळे : प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून होत असते. त्यांच्या पासून मिळणारी प्रेरणा, मार्गदर्शनामुळेच आयुष्याचे सोने होते. याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनाही आलेला आहे. शिक्षकांमुळे गणित, समाजशास्त्र या विषयांची आवड निर्माण झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या वान्मथी सी. यांचे इयत्ता सहावी ते १२वी पर्यंतचे शिक्षण तामिळनाडूतील सत्यमंगलम येथील शासकीय कन्या उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. त्यांना सुरवातीपासूनच गणित विषयाची आवड होती. शाळेतील शिक्षकांनी अगदी मनापासून प्रत्येक विषय शिकविला. त्यामुळे सर्वच विषयांची चांगल्याप्रकारे तयारी होत गेली. त्याचा आयुष्यात खूप उपयोग झाला. आठवीला असतांना रेणुका तर दहावीला असतांना कमला या शिक्षिकांनी आपल्याकडून विविध विषयांची तयारी करून घेतली. त्यामुळेच आपण आपले ध्येय गाठू शकलो, अशी भावना त्यांनी ‘शिक्षक दिना’निमित्त व्यक्त केली.