सांगा,आम्ही कसं वर्गात बसायचं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:40 AM2019-06-17T11:40:00+5:302019-06-17T11:41:28+5:30
विद्यार्थ्यांचा प्रश्न, धुळे जिल्ह्यात ११२ वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत
अतुल जोशी । आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्या काही वर्षात इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढलेले आहे. चकाचक टोलेजंग इमारती, सुसज्ज मैदान याची अनेकांना भुरळ पडते. मात्र इंग्रजी माध्यमाचा शैक्षणिक खर्च पेलवत नसल्याने, ग्रामीण भागातील अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल केले. परंतु जिल्ह्यातील काही जि.प. शाळांची अवस्था दयनीय झालेली आहे. गळके छत, तुटलेले दरवाजे, वर्ग खोल्यांमधील उखडलेली फरशी अशा अवस्थेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे म्हणजे शिक्षणापेक्षा शिक्षाच देण्याचा प्रकार आहे. जि.प. शाळांच्या जवळपास ११२ खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी सांगा, आम्ही वर्गात बसायचे कसे? असा प्रश्न उपस्थित केल्यास नवल वाटायला नको. नवीन शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच वर्गात बसावे लागण्याची चिन्हे आहेत. धुळे जिल्हयात जिल्हा परिषदेच्या ११०४ शाळा असून, एकूण ४ हजार ३२ वर्ग खोल्या आहेत. यापैकी ११२ वर्गखोल्या व १३ शाळा धोकादायक स्थितीत आहेत.
शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षण विभागाने एक पत्र काढून एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची खबदारी घ्यावी असे पत्र मुख्याध्यापकांना दिले आहे. मात्र ज्या मुलांना शाळेत दाखल करायचे आहे, त्यांना सुरक्षित ठिकाणी बसवावे तरी कुठे असा प्रश्न धोकादायक खोल्या असलेल्या ठिकाणच्या मुख्याध्यापकांना पडलेला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गावागावात जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. या शाळा अनेक वर्षांपूर्वीच्या असल्याने, यातील काही वर्गखोल्या नादुरूस्त झालेल्या आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११०४ शाळा असून, त्यात पहिली ते पाचवीपर्यंत ८८ हजार १४ व सहावी ते आठवीपर्यंत २ हजार ५३६ असे एकूण ९० हजार ५५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल झालेल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वच शाळांच्या भौतिक सुविधांकडे लक्ष देण्यात आलेले आहे. असे असले तरी काही शाळांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. आजच्या स्थितीत १३ धोकायदायक शाळा आहेत. तर ११२ वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असल्याने,त्याचा वापरच बंद करण्यात आलेला आहे. या वर्ग खोल्या दुरूस्तीसाठी १० कोटी ३० लाख ४० हजार रूपयांचा खर्च अपेक्षित असतांना गेल्या दोन वर्षांपासून नवीन खोलीसाठी निधीच मिळाला नसल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले आहे. ज्या गावांमध्ये धोकादायक शाळा आहेत, तेथील विद्यार्थ्यांची समाजमंदिर अथवा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत व्यवस्था करण्यात येते. तर काही ठिकाणी भाडेतत्वावर शाळा घेऊन तेथे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक धोकेदायक वर्ग खोल्या शिरपूर तालुक्यात आहे. या तालुक्यात ४५ वर्ग खोल्या शेवटची घटका मोजतायेत. तर धुळे तालुक्यात ३६, साक्री तालुक्यात २३ व शिंदखेडा तालुक्यात ८ वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. जिल्ह्यातील ४०२ शाळांसाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे जवळपास ३ कोटी रूपये मंजूर झालेले आहेत. मात्र अद्याप त्याचे वितरण सुरू झालेले नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी व चारही तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांची बैठक झाल्यानंतरच या निधीचे वितरण होऊ शकते असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांचे कौल फुटलेले आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, फरशी उखडलेली आहे. अशा परिस्थितीशी सामना करीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे काम करावे लागणार आहे. एकीकडे इंग्रजी शाळा प्रशस्त होत आहेत. खाजगी मराठी शाळांच्या इमारतीही टोलेजंग होत असतांना, जिल्हा परिषदेच्या शाळा कात कधी टाकणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद शाळांची अशीच स्थिती कायम राहील तर आहे तेवढे विद्यार्थी शाळेत टिकविणे अवघड होऊ शकते. त्यामुळे शाळांच्या दुरूस्तीकडे प्राधान्यांने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.