धुळे शहरात राम जन्मोत्सवासाठी मंदिरे सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 06:50 PM2018-03-24T18:50:19+5:302018-03-24T18:50:19+5:30
अनेक मंदिरांना शेकडो वर्षांची परंपरा, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : रामनवमी निमित्त रविवार २५ मार्च रोजी शहरातील विविध मंदिरांमध्ये भगवान प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त सर्वच श्रीराम मंदिरांमध्ये जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यासह शहरातील अनेक मंदिरांना शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. यंदाही तेथे पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. या निमित्त राम मंदिरांसह अन्य मंदिरांवरही आकर्षक रोषणाई करण्यात आली असून उत्सवमूर्तींना सजविण्यात आले आहे.
आग्रारोडवरील राममंदिर
जुन्या आग्रारोडवरील पट्टाभिषिक्त श्रीराम मंदीर संस्थानास सुमारे अनेक वर्षांची परंपरा आहे. येथे गुढीपाडवा ते राम नवमीपर्यंत रामाचे नवरात्र साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त सकाळी ७ वाजता सिद्धेश्वर भजनी मंडळ व सर्वसमावेशक भजनी मंडळाचा कार्यक्रम होत आहे. रामनवमीच्या दिवशी सकाळी १०.३० वाजेपासून श्रीराम जन्मापर्यंत संजय कुळकर्णी यांचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता बाळासाहेब कुळकर्णी यांच्या स्मरणार्थ डॉ. अभय व भाग्यश्री कुळकर्णी यांच्यातर्फे पवन शर्मा व सहकारी यांचा सुंदरकांड गायनाचा कार्यक्रम होईल.रात्री ९ वाजेपासून रामदेवबाबा भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. उपस्थितीचे आवाहन मंदिराचे ट्रस्टी प्रमोद मोराणकर, अभय नाशिककर, सुभाष कांकरिया, विजय पाच्छापुरकर, प्रशांत विसपुते, हर्षवर्धन बेलपाठक, भाग्यश्री कुळकर्णी यांनी केले आहे.
सुभाषनगरातील राममंदिर
जुने धुळ्यातील सुभाष नगरात असलेल्या राम मंदिरातही राम जन्माचा सोहळा साजरा होणार आहे. सकाळी १० ते १२ यावेळेत विविध धार्मिक कार्यक्रम व १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा होईल. त्यानंतर सायंकाळपर्यंत तीर्थप्रसादाचा कार्यक्रम होईल. या मंदिरास १३० वर्षांची परंपरा लाभली असल्याची माहिती चंद्रकांत केले यांनी दिली.