३६ न्यायाधीन बंदिवानांना तात्पुरता जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:02 PM2020-05-12T17:02:56+5:302020-05-12T17:03:47+5:30

जिल्हा कारागृह : न्यायालयाच्या आदेशानंतर अंमलबजावणी

Temporary bail to 36 detainees | ३६ न्यायाधीन बंदिवानांना तात्पुरता जामीन

dhule

Next

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील कारागृहात सुरक्षिततेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे़ पहिल्यांदाच सॅनिटायझर आणि मास्कचा वापर होत आहे़ याशिवाय आतापर्यंत ७ वर्षापर्यंत शिक्षा लागू शकते अशा ३६ न्यायाधीन बंदिवानाना न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, अशी माहिती धुळे जिल्हा कारागृह अधीक्षक डी.जी.गावडे यांनी दिली.
कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशपातळीवरुन दखल घेण्यात आलेली आहे़ त्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले असून गर्दी टाळा, घरी बसा असे वेळोवेळी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे़ याची दखल कारागृहातील बंदिवानांसाठी देखील घेण्यात आलेली आहे़ न्यायालयस्तरावर विचार विनिमय होऊन दखल घेण्यात आली़ त्यात ७ वर्षापर्यंत अथवा त्या खालोखाल शिक्षेस पात्र ठरु शकतात अशा बंदिवानांसाठी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर करण्याचे आदेश पारीत केले़ त्यानुसार एप्रिल महिन्यात २४ न्यायाधीन बंदीवानांना जामीनवर सोडण्यात आले. सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहनाची व्यवस्था नाही की संबंधित बंदीवानांचे कोणी नातेवाईक येऊ शकत नाही ही बाब लक्षात घेऊन दोन वाहनाच्या माध्यमातून त्या २४ पुरुष न्यायाधीन बंदिवानांना त्यांच्या घरापर्यंत सोडून देण्यात आले होते.त्यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्यांकडून बंदिवानाना ताब्यात देण्यासंदर्भात आणि शासनाचे आणि कायद्याचे पालन करण्याबाबत लिहून घेण्यात आलेले आहे़
त्यानंतर मे महिन्यात आणखी १२ बंदिवानांना तात्पुरता जामीनावर सोडून देण्यात आले आहे.
हा तात्पुरता जामीन सुरुवातीला ४५ दिवसांसाठी असणार आहे़ त्यानंतर आवश्यकता भासेल तसे ३० दिवसांप्रमाणे जामीनाची मुदत वाढविण्यात येणार आहे़ कोरोनाच्या अनुषंगाने धुळ्यातील कारागृहात आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्यात येत आहे़ यांच्यासह कारागृहातील सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आलेले आहे़ न्यायालयात गर्दी होऊ नये यासाठी कारागृहातूनच सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज होत आहे़ त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी कोणत्याही बंदिवान्याला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही़
न्यायाधीन बंदिवानाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कारागृह अधीक्षक डी़ जी़ गावडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी दिपा आगे, मंडळ तुरुंगाधिकारी एऩ एम़ कन्नेडवाल, महिला तुरुंगाधिकारी नेहा गुजराथी, वैद्यकीय अधिकारी शिवाजी जायभाये, शिक्षक हेमंत पोतदार आणि अन्य पोलीस महिला व पुरुष कर्मचारी लक्ष ठेवून असतात़

Web Title: Temporary bail to 36 detainees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे