धुळ्यात तिघांवर तलवारीने वार झाल्याने वाढला तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:42 PM2018-02-22T17:42:55+5:302018-02-22T17:52:08+5:30
निवडणुकीच्या वादाचे पडसाद : सिंधी पंचायतचे अध्यक्षांसह तीन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री रोडवरील कुमार नगरात दोन गटात गुरुवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास वाद झाला़ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने तलवारीचा वापर झाला़ यात सिंधी पंचायत अध्यक्षांसह तिघांना दुखापत झाली़ या घटनेनंतर कुमार नगर भागात तणावाचे वातावरण आहे़
सिंधी पंचायतचे अध्यक्ष गुलशन ओमप्रकाश उदासी (३७) रा़ कुमार नगर साक्री रोड धुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास सिंधी पंचायत निवडणुकीच्या वादातून लेखराज मेवाणीसह सात ते आठ जणांनी उदासी यांच्यावर हल्ला केला़ तलवारीने वार केल्यामुळे उदासी हे जबर जखमी झाले़ त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़
तर, लखन लेखराज मेवाणी (३७) यांच्या म्हणण्यानुसार, सिंधी पंचायत निवडणुकीचा वाद उकरुन काढत बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास गुलशन ओमप्रकाश उदासी आणि त्यांच्यासह ४ ते ५ जणांनी लेखन मेवाणी आणि अनिल करमचंद दुसेजा (२८) रा़ कुमार नगर यांच्यावर तलवारीने वार केले़ तसेच त्यांच्यावर घावही मारला़ या हल्यात ते जबर जखमी झाले़ त्यांना गुरुवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास हिरे मेडीकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले़ या हल्यातील तिघां जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़