बॅनर फाडल्यावरुन तणाव, सांगवीत संचारबंदी; दगडफेकीत २० पोलिस जखमी, १५० जणांवर गुन्हा दाखल
By देवेंद्र पाठक | Published: August 11, 2023 11:30 AM2023-08-11T11:30:18+5:302023-08-11T11:32:35+5:30
पोलिसांकडून संशयितांची धरपकड...
शिरपूर : बॅनर फाडण्याच्या कारणावरुन शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात गुरुवारी सायंकाळी उशिरा दोन गटात तुफान हाणामारी झाली. तणावाची स्थिती निर्माण होतास धुळ्याहून पोलिस रवाना झाले. जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. पोलिसांच्या वाहनासह आमदार काशिराम पावरा यांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याचे वाहनांचे नुकसान झाले आहे.
या दगडफेकीत पोलिस अधिकारी, कर्मचारी मिळून २० जणांना दुखापत झाली. शुक्रवारी सकाळी १५० जणांवर सांगवी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण मोरे यांच्या फिर्यादीवरुन दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गावात शांतता असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांसह पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.