सोनगीरच्या दंगलीनंतर तणावपूर्ण वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:07 AM2018-02-19T11:07:56+5:302018-02-19T11:09:06+5:30
५४ जणांविरुध्द गुन्हा दाखल : रविवारी पहाटेची कारवाई, संशयितांची धरपकड
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : येथील बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी भाजीपालाचे लॉरी लावण्यावरुन दोघात झालेला वाद व त्यातून झालेल्या दगडफेकीत प्रार्थनास्थळाचे काचा फुटल्या़ या प्रकरणी ३२ जणांसह नाव माहिती नसलेल्या सुमारे २२ अशा ५४ संशयितांविरुध्द रविवारी पहाटे तीनच्या सुमारास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे़ गेल्या आठशे वर्षाच्या दोन समाजातील एकतेच्या अभेद्य भिंतीला या घटनेमुळे तडा गेला.
येथील बसस्थानकावर शनिवारी सायंकाळी भाजीपालासह अन्य विक्रेत्यांच्या लॉरींची एवढी गर्दी असते की गावात जाण्यासाठी अन्य वाहनांना जागा रहात नाही. त्यातच प्रवासी वाहतूक करणाºया कालीपिली, बस व अन्य वाहनांमुळे प्रवाशांना देखील उभे राहायला जागा नसते. त्यामुळे बसस्थानकावर नेहमी वाद होतात. आजही तसाच प्रकार झाला. दोन जणांमध्ये लॉरी लावण्यावरुन सायंकाळी सातला वाद झाला. दोन्ही वेगवेगळ्या समाजाचे असल्याने त्याला धार्मिक रंग चढला. गर्दी जमली. वादात बुधा भगवान माळी व आरिफ शेख आसिफ शेख यांच्या डोक्यास मार लागला. पोलिसांनी तो वाद मिटविला. मात्र अफवेतून पुन्हा सायंकाळी साडेसातला दगडफेकीचा प्रकार झाला. रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, माजी सरपंच किशोर शुक्ल, माजी उपसरपंच कैलास वाणी, आरिफ पठाण, मुन्ना शेख, शफियोद्दीन पठाण, प्रमोद धनगर, आर. के. माळी यांच्यासह दोन्ही गटातील ग्रामस्थ उपस्थित होते. तेव्हा दोन्ही गटांनी आमची काही तक्रार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली व पोलीसांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली़
निरपराधांचा बळी
दगडफेकीत काही निरपराध मुले असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे, अशी विनंती आर. के. माळी, प्रमोद धनगर, साहेबराव बिरारी आदींनी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याकडे केली. तेव्हा चौकशीत निरपराध आढळल्यास कारवाई मागे घेतली जाईल, असे ज्ञानेश्वर वारे यांनी स्पष्ट केले. बहुतेक युवक पंचविशीच्या आतील असून सुशिक्षित व काही नोकरदार आहेत. जर त्यात काही निरपराध असतील तर त्या मुलांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होणार असल्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली़ सोनगीर पोलीस ठाण्यात एकूण ३२ जणांविरुध्द भादंवि कलम ३०७, ३५३, ३३२, ३३६, ३३७, २९५, १४७, १४८, १४९, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़