सरपंच झाल्यात दहावी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:40 PM2020-08-01T13:40:06+5:302020-08-01T13:44:24+5:30
गावाचा कारभार सांभाळून दहावीत ५० टक्के गुण
न्याहळोद :जिद्द आणि शिकण्याची आवड असली तर कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घेता येते याचा अनुभव न्याहळोद येथील लोकनियुक्त सरपंच ज्योती भील यांच्या माध्यमातून आला आहे. ज्योती भैय्या भील यांनी गावाचा कारभार सांभाळून दहावीत ५० टक्के गुण मिळविले आहेत.
ज्योती भिल या धुळे येथे सातपुडा हायस्कूलमध्ये सहावीत शिकत असतांनाच त्यांचे लग्न झाले. मात्र अल्पवयीन असल्याने त्या माहेरी होत्या. नंतर दहावीला सासरी यावे लागल्याने शिक्षणात तब्बल सात वर्षाचा खंड पडला. पुढे मुले सांभाळण्यात काही वर्षे गेली. मात्र शिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा कायम होती. चार वर्षांपूर्वी त्या न्याहळोद गावाच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. गावाचा कारभार पाहत असतांना आपले शिक्षण कमी असल्याची खंत त्यांना होती.त्यातूनच त्यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घतला. नाशिक येथे १७ क्रमांकाचा अर्ज भरला. त्यांना गावचे गट नेते विकास पवार यांनी मार्गदर्शन केले शिवाजी हायस्कूल येथे परीक्षा दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात त्यांनी ५० टक्के गुण मिळविले. त्यांचा मोठा मुलगा पहिलीत तर लहान अंगणवाडीत आहे . ग्रामपंचायती आता आधुनिक झाल्या आहेत. संगणक प्रणालीचा वापर, आॅन लाईन कामांची मागणी या सर्व गोष्टी करायच्या असल्या तर शिक्षण हवेच. यासाठी दहावीची परीक्षा देण्याचे ठरवले. गावाचा राढा , मुलांची तब्येत सांभाळून अभ्यास करणे म्हणजे तारेवरची कसरत होती. मात्र जिद्द ठेवत परीक्षा देत यश मिळविल्याचे ज्योती भील यांनी सांगितले.