दहावीचा निकाल ३४.७७ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:30 PM2019-08-30T22:30:30+5:302019-08-30T22:30:39+5:30
विभागात सर्वाधिक निकाल धुळे जिल्ह्याचा : गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार
धुळे : महाराष्टराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-आॅगस्ट २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. धुळे जिल्ह्याचा निकाल ३४.७७ टक्के लागला. विभागात सर्वाधिक निकाल धुळे जिल्ह्याचाच लागला आहे.
मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने तत्काळ पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय तीन वर्षांपासून अंमलात आणला आहे. यापूर्वी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारी पुरवणी परीक्षा यावर्षी १७ जुलै ते ३ आॅगस्ट २०१९ दरम्यान घेण्यात आली. ही परीक्षा धुळ्यातील दोन, व साक्री, शिरपूर व शिंदखेड्यातील प्रत्येकी एक-एक अशा पाच केंद्रावर घेण्यात आली. परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ५०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ३४.७७ टक्के असल्याची माहिती नाशिक बोर्डातून देण्यात आली.
विभागात जिल्हा अव्वल
नाशिक विभागात सर्वाधिक निकाल धुळे जिल्ह्याचा लागला आहे. दुसºया स्थानी जळगाव जिल्हा (३१.१३ टक्के), तिसºया स्थानी नंदुरबार जिलहा (२९.७१ टक्के) लागला. तर सर्वात कमी निकाल नाशिक जिल्ह्याचा १७.१४ टक्के लागला आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची आहे, त्यांना ३१ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर १९ या कालावधीत मंडळाकडे अर्ज करता येईल.
अकरावीत घेता येणार प्रवेश
मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये पुन्हा परीक्षेची संधी दिली. यात १२२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांना आता ११वीत प्रवेश घेता येणार आहे.