थाळनेर ग्रामसभा तक्रारींनी गाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:39 PM2019-09-13T22:39:31+5:302019-09-13T22:39:50+5:30
अतिक्रमणे काढून वृक्षारोपण करावे : अन्य बँकेची शाखा सुरू करावी, रुग्णवाहिकेवर चालकाची आवश्यकता
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध तक्रारींनी गाजली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच प्रशांत निकम होते.
लोकनियुक्त सरपंच यांनी मागील ग्रामसभेचे क्रॉस सेलिंग वाचून दाखवले. २०१९-२० च्या १४व्या वित्त आयोगाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. सभेत भाजी मार्केटजवळ टॉवर मंजुरी देण्यात आली. तसेच इतर मोबाईलचे टॉवरही या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली. अनेक शासकीय कर्मचारी मुख्यालयी न थांबता बाहेरगावाहून ये-जा करतात. त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी करण्यात आली. शासकीय कर्मचाऱ्यांवर नियंत्रणासाठी ग्रामपंचायत कार्यालयात थम मशीन बसविण्यात यावे. सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक यांच्याबाबतीत तक्रार करण्यात आली. गावात इतर बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. एस.टी. महामंडळ बस स्थानकाचा उपयोग करत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. प्रवाशांना इतरत्र उभे राहावे लागते. एसटी महामंडळाकडून सदर जागा ग्रामपंचायतने परत घ्यावी.
यावेळी कुबेर जमादार यांनी ग्रामपंचायतीने मागील वर्षी किती झाडे लावली व किती जगवली याबाबत प्रश्न उपस्थित केला. याबाबत सरपंचांना किती झाडे जगली त्याबाबत माहिती देता आली नाही. गावठाण व गुरुचरण जागेवरील अतिक्रमण काढून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात यावे. गावठाण व गुरुचरण जागेवर बेकायदेशीर बोरवेल धारकावर कारवाई करण्यात यावी. डोंगर कोळी यांनी कुंभारटेक भागातील जि.प. शाळेचे संरक्षक भिंतीचा प्रश्न उपस्थित केला. कुंभार टेक भागात पायºया करण्यात याव्यात. घंटा गाडीवर चालकाची नेमणूक करावी. घरकुल योजनेतील लाभार्थीकडून काही ग्रामपंचायत सदस्य पैशांची मागणी करतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
रूग्णसेवा अत्यावश्यक सेवा असतानाही गावातील एक खाजगी डॉक्टर रुग्णांना मुद्दाम फिरवाफिरव करतात. त्या डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव आहे. गावातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यात मुरूम टाकण्यात यावा. आधी तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. नागरिकांचे अर्ज वाचन करण्यात आले केंद्र शासनाने ३७० कलम हटविलेबद्दल अभिनंदन ठराव करण्यात आला. स्वच्छतेबाबत शपथ घेऊन या सभेची सांगता करण्यात आली.
ग्रामसभेस उपसरपंच आशाबाई वामन कोळी, ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडीले, भटू शिरसाठ, श्याम भिल, शांताराम कोळी, रमेश मराठे, सोसायटी चेअरमन दिनकरराव पाटील, पिक संरक्षण सोसायटी चेअरमन किशोर पाटील, उज्वल निकम, बबलू मराठे, विजय वाडीले, सुनील शिरसाठ, पंडित सावळे, धोंडू जाधव व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.