पुण्याकडे जाणारी कार तपासली, गोणीत निघाला ४२ हजारांचा गांजा
By देवेंद्र पाठक | Published: January 15, 2024 06:56 PM2024-01-15T18:56:06+5:302024-01-15T18:56:20+5:30
वाहनासह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
धुळे : नगाव शिवारात पोलिसांकडून वाहनाची तपासणी सुरू असताना कारमध्ये लपवून ठेवलेला गांजा पकडण्यात पश्चिम देवपूर पोलिसांना यश आले. ही कारवाई रविवारी करण्यात आली. ४२ हजारांच्या गांजासह कार असा २ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात महादेव ऊर्फ आबा मोहन जाधव (वय ३६, रा. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली.
पश्चिम देवपूर पोलिसांच्या पथकाने वाहनाची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. एका मागून एक वाहने तपासली जात असताना एमएच १२ केवाय ३०२८ क्रमांकाची कार आली. कारमध्ये काय आहे याची विचारणा केली असताना चालकाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. पोलिसांना संशय आल्याने कारची कसून तपासणी करण्यात आली असता त्यात गोणीमध्ये लपवून ठेवलेला गांजा पोलिसांना सापडला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नगाव शिवारात गॅलेक्सी पार्कसमोर सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ६ किलो वजनाचा ४२ हजार रुपये किमतीचा गांजा, ५ हजार रुपयांचा मोबाइल, अडीच लाखांची कार आणि बॅग असा एकूण २ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महादेव ऊर्फ आबा मोहन जाधव (वय ३६, रा. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे घटनेचा तपास करीत आहेत.