नाकाबंदी करून कार हेरली, १ लाखांची बनावट दारू जप्त केली
By देवेंद्र पाठक | Published: June 21, 2024 10:17 PM2024-06-21T22:17:55+5:302024-06-21T22:18:10+5:30
वाहनासह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची साक्री तालुक्यातील वेहेरगाव फाट्यावर कारवाई
धुळे : साक्री तालुक्यातील वेहेरगाव फाट्याकडून रायपूरबारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कारमधून होणारी बनावट मद्याची तस्करी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुुरुवारी रात्री उघड केली. या कारवाईत ३ लाख ६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांना पकडण्यात आले असून एकजण फरार होण्यात यशस्वी झाला.
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना साक्री तालुक्यातील वेहेरगाव फाट्यावरून रायपूरबारीकडे एमएच १९ सीएफ ४७३९ क्रमांकाच्या कारमधून बनावट मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पवार यांनी पथकास कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने वेहेरगाव फाटा ते रायपूरबारीदरम्यान नाकाबंदी करत पाळत ठेवली. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संशयित कार येताना पथकाच्या निदर्शनास आली. या कारला थांबवून कारची तपासणी केली असता कारमध्ये १ लाख ८०० रुपये किमतीचा बनावट मद्यसाठा आढळून आला. या कारवाईत बनावट मद्यासह दोन लाख रूपये किमतीची कार, सहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण ३ लाख ६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी योगेश जगताप यांच्या फिर्यादीवरून रज्जाक सिकंदर पटवे (वय ४२, रा. भोई गल्ली, साक्री), महेंद्र शिवाजी चौधरी (वय २८, रा. शिवाजीनगर, साक्री), रावसाहेब कारभारी अहिरे (वय ४४, रा. कासारे) यांना अटक करण्यात आली. एकजण फरार आहे. या चौघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३२८, ३४ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (अ) ६५ (ई), ८३ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, धनंजय मोरे, संजय पाटील, चेतन बोरसे, तुषार सूर्यवंशी, योगेश जगताप या पथकाने केली.