चिल्लाने का नहीं, काट डालेंगे म्हणत कापूस लांबविला!

By देवेंद्र पाठक | Published: December 26, 2023 05:53 PM2023-12-26T17:53:58+5:302023-12-26T17:54:27+5:30

भरवाडे शिवार : ३५ हजारांचा ऐवज; जबरी चोरीचा गुन्हा.

The cotton was extended by shouting, "Why not, I will cut it!" | चिल्लाने का नहीं, काट डालेंगे म्हणत कापूस लांबविला!

चिल्लाने का नहीं, काट डालेंगे म्हणत कापूस लांबविला!

धुळे : चिल्लाने का नहीं, काट डालेंगे, असे हिंदीमध्ये बोलत तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चौघांनी पत्र्याचे शेड तोडून ३५ हजार रुपये किंमतीचा कापूस बळजबरीने चोरून नेला. ही घटना शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारात सोमवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अनोळखी चार जणांविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द गाव शिवारातील भरवाडे गावाच्या फाट्याच्या पुढे शहादा रोडलगत सुभाष हरी बडगुजर (वय ७९) यांचे शेत आहे. या शेतात त्यांनी एका बाजूला पत्र्याचे शेड उभारलेले आहे. त्या शेडमध्ये त्यांनी ५ क्विंटल कापूस ठेवलेला होता. शेतात ते झोपलेले असताना चार अनोळखी तोंडाला रुमाल बांधून त्यांच्याजवळ आले. कोणी येत असल्याची चाहूल लागताच त्यांना जाग आली. त्यावेळी आरडाओरड करताच एकाने त्यांचे हात धरले. दुसऱ्याने त्यांचे पाय धरून ठेवले. चिल्लाने का नही, काट डालेंगे, असे म्हणत धाक दाखविला. 

जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने सुभाष बडगुजर हे शांत राहिले. त्यांच्यासमोर पत्र्याच्या शेडमधून एका टेम्पोमध्ये आलेल्या चौघांपैकी दोघांनी कापूस भरला आणि बडगुजर यांच्या समोर ३५ हजार रुपये किमतीचा पाच ते सहा क्विंटल कापूस चोरून नेण्यात आला. या चौघांनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने आणि अंधाराचा फायदा घेऊन कापूस चोरी करणाऱ्या चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. ते चौघे गेल्यानंतर आरडाओरड करताच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली. तोपर्यंत लूट करणारे चौघे पळून जाण्यात यशस्वी ठरले.

सुभाष बडगुजर यांनी स्वत:ला सावरून शिरपूर शहर पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानुसार चार जणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: The cotton was extended by shouting, "Why not, I will cut it!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे