धमाने ग्रामपंचायतीला सरपंचासह सदस्यांनी ठोकले ताळे, ग्रामसेवक येत नसल्याने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 04:53 PM2023-07-27T16:53:29+5:302023-07-27T16:53:51+5:30
धमाने ग्रामपंचायतमध्ये भगवान राजपूत हे ग्रामसेवक आहेत. गेल्या एक महिनाभरापासून ते ग्रामपंचायतीत येत नाहीत.
धुळे : तालुक्यातील धमाने येथील ग्रामपंचायतीत गेल्या एक महिन्यापासून ग्रामसेवक येत नसल्याने, संतप्त झालेल्या सरपंच, व सदस्यांनी ग्रामपंचायतीला बुधवारी सायंकाळी टाळे ठोकले. दरम्यान सायंकाळी उशीरा आलेल्या ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीत घेण्यास सरपंचसह सदस्यांनी विरोध केला. ग्रामसेवकावर कारवाई केल्यानंतरच कुलूप उघडले जाईल असा पवित्रा घेतला आहे.
धमाने ग्रामपंचायतमध्ये भगवान राजपूत हे ग्रामसेवक आहेत. गेल्या एक महिनाभरापासून ते ग्रामपंचायतीत येत नाहीत. गावात येत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांच्या विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते..या संदर्भात बुधवारी सरपंच मीनाबाई ठाकरे यांच्यासह सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांना निवेदन दिले व ग्रामसेवकाबाबततक्रार केल्या.
सीईओंना निवेदन देताच बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ग्रामविस्तार अधिकारी भीमराव गरुड व ग्रामसेवक भगवान राजपूत हे ग्रामपंचायत आले . त्यांनी ग्रामपंचायतचे कुलूप उघडण्याची विनंती केली..मात्र सरपंच मीनाबाई ठाकरे यांनी ग्रामपंचायतीचे कुलूप उघडण्यास व चर्चा नकार दिला .जोपर्यंत ग्रामसेवक का येत नव्हते याची कारणे विचारा, त्यांच्यावर कारवाई करा, मगच आम्ही चर्चेस सामोरे जाऊ असा पवित्र घेतला.