धुळे, दोंडाईचा बाजार समितीसाठी ७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
By अतुल जोशी | Published: April 28, 2023 06:51 PM2023-04-28T18:51:03+5:302023-04-28T18:51:19+5:30
धुळे बाजार समितीच्या १८ पैकी २ जागा बिनविरोध झालेल्या असल्याने, याठिकाणी १६ जागांसाठी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत
धुळे - धुळे व दोंडाईचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी सरासरी ९७ टक्के मतदान झाले. धुळे व दोंडाईचा येथील प्रत्येकी १६-१६ जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दोन्ही ठिकाणी भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत असल्याने, या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
धुळे बाजार समितीच्या १८ पैकी २ जागा बिनविरोध झालेल्या असल्याने, याठिकाणी १६ जागांसाठी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येथे भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगलेला आहे. सायंकाळी ४ पर्यंत ३५९० पैकी ३ हजार ४६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ९६.४६ इतकी आहे. धुळे बाजार समितीचा निकाल ३० रोजी जाहीर होणार आहे. तर दोंडाईचा बाजार समितीच्याही १८ जागा असून, दोन जागा बिनविरोध झालेल्या असल्याने, १६ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येथेही भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशीच चुरस आहे. याठिकाणी ३०६० पैकी २ हजार ९५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ९६.४४ एवढी आह. दोंडाईचा बाजार समितीसाठी २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.