घंटागाड्यांची चाके थांबली, धुळे शहरात निर्माण झाले घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2023 03:13 PM2023-07-22T15:13:11+5:302023-07-22T15:14:33+5:30
महानगरपालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
डम्पिंग यार्ड मध्ये कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत धुळे शहरातील कचरा उचलण्यात आला नाही. एकही घंटागाडी कचरा उचलण्यासाठी आली नाही परिणामी धुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ऐन पावसाळ्यात शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
धुळे महानगरपालिकेच्या ११० घंटा गाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा वरखेडी रोड येथील डम्पिंग यार्ड मध्ये टाकला जातो. पण पावसामुळे त्याठिकाणी चिखल झाल्यामुळे कचरा टाकण्यास अडचण येत आहे. त्यामुळे गुरुवारी शहरातील कचरा घेण्यासाठी घंटागाड्या आल्याच नाहीत. नवरंग पाण्याच्या टाकीजवळ सर्व घंटागाड्या दिवसभर उभ्या होत्या.
घंटागाडी कचरा उचलण्यासाठी आली नसल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळे शहरातील बारा पत्थर चौक, तहसील कार्यालय तसेच जुनी महानगरपालिका इमारत या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कचरा न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा समाजवादी पक्षाचे नगरसेवक आमिन पटेल यांनी दिला आहे.