केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे घेतले जबाब; मुख्याध्यापक मद्य प्राशनप्रकरण
By अतुल जोशी | Published: February 13, 2024 08:34 PM2024-02-13T20:34:29+5:302024-02-13T20:34:40+5:30
अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेतील मुख्याध्यापकाने वर्गातच मद्य प्राशन केल्याच्या तक्रारीनंतर केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांनी मंगळवारी जि. प. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे जबाब घेतले. दरम्यान, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी हा चौकशी अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील जि.प. केंद्र शाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे हे वर्गातच मद्य प्राशन करतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकाची कानउघाडणी केली होती, तर मुख्याध्यापकाने आपल्यावर झालेले आरोप फेटाळले होते.
दरम्यान, मुख्याध्यापकाच्या मद्य प्राशनाची शिंदखेडा तालुका शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली. गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील यांनी सोमवारीच त्या मुख्याध्यापकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती, तर मंगळवारी केंद्रप्रमुख अरविंद पाटील, केंद्रप्रमुख सी. जी. बोरसे, विस्तार अधिकारी शैलजा शिंदे, मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव या चौघांनी मंगळवारी कुरुकवाडे जि. प. शाळेला भेट दिली. त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेतले. चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून गटशिक्षणाधिकारी डॉ. पाटील यांनी चौकशी अहवाल प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्याकडे पाठविला असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. आता शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.