मदत पोहोचण्यापूर्वीच विद्यार्थिनीने घेतला जगाचा निरोप!
By अतुल जोशी | Published: September 26, 2023 03:33 PM2023-09-26T15:33:40+5:302023-09-26T15:33:49+5:30
जैताणे (ता.जैताणे) येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील उपासना महाजन ही गुणवंत विद्यार्थिनी.
धुळे : शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी म्हणून ओळख असलेल्या नववीच्या उपासना दिनेश महाजन हिला न्यूमोनिया झाला. तिच्या घरची परिस्थिती हलाखीची. अशाही परिस्थितीत पालकांनी तिला नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपासनाच्या कुटुंबाजवळ उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते, ही बाब शाळेतील शिक्षक, विद्यार्थिनींना समजली. त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ग्रामस्थांच्या सहकार्यातून ६० हजार रुपये जमा केले. जमा केलेली मदत उपासनाच्या पालकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिने या जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जैताणे (ता.जैताणे) येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील उपासना महाजन ही गुणवंत विद्यार्थिनी. उपासनाला न्यूमोनिया आजाराने ग्रासले. तिला उपचारार्थ पालकांनी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; पण रुग्णालयाचा खर्च जास्त असल्याने, महाजन कुटुंबीयाला आर्थिक मदतीची गरज भासली. ही बाब शाळेतील शिक्षक, विद्यार्थिनींना शनिवारी समजली.
शिक्षक व विद्यार्थिनींनीही तत्परता दाखविली. शाळेने ४५ हजारांची मदत जमा केली. विद्यार्थिनींनीही त्यांच्या खाऊचे पैसे उपासनाच्या उपचारासाठी दिले. ग्रामस्थांनीही सढळ हाताने मदत केली. अशी एकूण ६० हजार रुपयांची मदत निधी जमा झाला. मात्र मदत पोहोचण्यापूर्वीच तिने सोमवारी दुपारी या जगाचा निरोप घेतला. जमा केलेली मदत तशीच राहिली.