जीएसटी अधिकाऱ्याचा बनाव करत ट्रक मालकाला घातला सव्वा लाखाचा ऑनलाइन गंडा!

By देवेंद्र पाठक | Published: January 5, 2024 04:38 PM2024-01-05T16:38:42+5:302024-01-05T16:39:11+5:30

याप्रकरणी अनोळखी चार जणांविराेधात आझादनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

The truck owner was cheated online by pretending to be a GST officer! | जीएसटी अधिकाऱ्याचा बनाव करत ट्रक मालकाला घातला सव्वा लाखाचा ऑनलाइन गंडा!

जीएसटी अधिकाऱ्याचा बनाव करत ट्रक मालकाला घातला सव्वा लाखाचा ऑनलाइन गंडा!

धुळे : पंजाबकडून पुण्याकडे जात असलेल्या ट्रक धुळ्यानजीक गुरुद्वाराजवळ अडविण्यात आला. जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करून पंजाबमधील ट्रक मालकाकडून १ लाख ३० हजार रुपये ऑनलाइन मागविण्यात आले. त्यानंतर ट्रक सोडून देण्यात आला. चौकशीअंती अधिकारी हे खोटे असल्याचे लक्षात आले. ही घटना १७ नाेव्हेंबर २०२३ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अनोळखी चार जणांविराेधात आझादनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

कश्मीरसिंग सरदार हजारसिंग बाजवा (वय ५९, रा. पटियाला, पंजाब) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पीबी ११ सीझेड ०७५६ क्रमांकाचा ट्रक पंजाब राज्यातील पटियाला येथून पुण्याच्या दिशेने निघाला. या ट्रकमध्ये चिलिंग एअरकंडिशन मशीन ठेवलेले होते. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून हा ट्रक धुळ्यानजीक गुरुद्वाराजवळ पोहोचला, त्यावेळेस ४ जण खाकी रंगाचा ड्रेस परिधान करून लाल रंगाचा दिवा असलेल्या गाडीजवळ उभे होते. त्यांनी ट्रक अडविला, ट्रकमध्ये काय आहे अशी विचारणा करत आम्ही जीएसटी विभागाचे अधिकारी आहोत, ट्रकची कागदपत्रे दाखवा अशी मागणी केली. कागदपत्रातील एका बिलात फर्मच्या नावात चूक असल्याचे सांगत ट्रक मालक कश्मीरसिंग सरदार हजारसिंग बाजवा यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला, १२ लाख ९६ हजारांची मागणी त्यांनी केली. पैसे दिले तरच ट्रक सोडण्याची भाषा करण्यात आली. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. शेवटी तडजोडअंती १ लाख ३० हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. गुगल पेच्या माध्यमातून ही रक्कम टाकण्यात आली आणि त्यानंतर चौघांनी ट्रक सोडला. हा ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला.

त्यानंतर चाैकशी केली असता असा कुठलाच प्रकार नसून ते चौघे जीएसटी विभागाचे अधिकारी नव्हते, त्यांनी फसगत केल्याचे लक्षात येताच कश्मीरसिंग यांनी आझादनगर पोलिस ठाणे गाठत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता चार अनोळखी इसमांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक एस. बी. पाटील घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: The truck owner was cheated online by pretending to be a GST officer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.