दोघा दुचाकी चोरट्यांना हौस आली अंगलट; सापळा लावून चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात
By देवेंद्र पाठक | Published: June 26, 2023 11:20 PM2023-06-26T23:20:16+5:302023-06-26T23:20:34+5:30
२० दुचाकी केल्या हस्तगत
धुळे : दुचाकी चोरायची, पेट्रोल असेपर्यंत फिरवायची. पेट्रोल संपले की तिथेच सोडून द्यायची. तर कधी मिळेल त्या पैशांत दुचाकी विकून मजा करायची असा सुरू असलेला दोन तरुण चोरट्यांचा अजब प्रकार पिंपळनेर पोलिसांनी अक्षरश: हाणून पाडला. जेमतेम शिकलेल्या या दोघा चाेरट्यांची हौस त्यांच्याच कधी अंगलट आली, हे त्यांनाही कळले नाही. अक्षरश: सापळा लावून त्यांना जेरबंद करण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून ६ लाख २५ हजार रुपये किमतीच्या २० चोरीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पिंपळनेरचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्यासह पिंपळनेर पोलिसांचे पथक उपस्थित होते.
साक्री तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरात मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. त्यावर निर्बंध आणण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी सूचना केल्या होत्या. पोलिसांचा शोध सुरू असतानाच पोलिस कर्मचारी राकेश बोरसे यांना मोटारसायकल चेारी करणाऱ्या टोळीबद्दल गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळविली. त्याची पडताळणी करण्यात आली. खातरजमा केल्यावर सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी एक पथक नियुक्त केले. त्या पथकाने साक्री तालुक्यातील शेंदवड येथे राहणारा शामील पांडू बागूल (वय २१) या तरुणाला सापळा लावून ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने काही माहिती दिली नाही. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. एवढेच नाही तर त्याचा साथीदार रोशन सुरेश गायकवाड (वय २३, रा. विरगाव, ता. बागलाण, जि. नाशिक) याचे नाव चौकशीतून समोर आले. शामील याने रोशनची मदत घेऊन साक्री तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातून माेटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. दोघांच्या या टोळीने देशशिरवाडे येथून १८ एपिल रोजी, तर बोपखेल गावातून २१ जून रोजी मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. तसेच नाशिक ग्रामीणमधून छावणी, मालेगाव कॅम्प, वडनेर, खाकुर्डी, सटाणा या परिसरातून मोटारसायकली लंपास केल्याचे सांगितले.
ही कामगिरी पिंपळनेरचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे, सहायक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण गवळी, कर्मचारी कांतीलाल अहिरे, प्रकाश सोनवणे, अतुल पाटील, भास्कर सूर्यवंशी, राकेश बोरसे यानी केली.