वाहनांना हायवेवर रोखून वसुली, तिघांची मुख्यालयात रवानगी, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा तडकाफडकी आदेश
By देवेंद्र पाठक | Published: January 9, 2024 06:02 PM2024-01-09T18:02:03+5:302024-01-09T18:03:41+5:30
Dhule News: महामार्गावर विनाकारण थांबून वाहनचालकांना त्रास देणाऱ्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खासगी वाहनातून येऊन पकडले. त्यांना खडेबोल सुनावत त्यांची रवानगी पोलिस मुख्यालयात करण्यात आली.
- देवेंद्र पाठक
धुळे - महामार्गावर विनाकारण थांबून वाहनचालकांना त्रास देणाऱ्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खासगी वाहनातून येऊन पकडले. त्यांना खडेबोल सुनावत त्यांची रवानगी पोलिस मुख्यालयात करण्यात आली. यात सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मधुकर ठाकरे आणि पोलिस शिपाई सिराज सलीम खाटीक हे दोघे सोनगीर पोलिस ठाण्याचे तर दीपक गुलाबराव पाटील हे धुळे तालुका पोलिस ठाण्याचे आहेत. ही कारवाई सेामवारी रात्री करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उढाली.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोनगीर टोलनाक्याजवळ काही पोलिस कर्मचारी विनाकारण वाहनधारकांना त्रास देतात. पैसे वसूल करत असाल्याची तक्रार पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे आली. त्यांनी या तक्रारीची गांभिर्याने दखल घेतली. कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक धिवरे यांनी खासगी वाहनातून प्रवास करीत कर्मचाऱ्यांना पकडले. त्यावेळी ते वाहन चालकांकडून बेकायदेशीर वसुली करत होते. याची गांभिर्याने दखल घेऊन तडका फडकी तिघांची रवानगी पोलिस मुख्यालयात करण्यात आली. यात सोनगीर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मधुकर ठाकरे यांची मोटार परिवहन विभागात बदली झाली. पोलिस शिपाई सिराज सलीम खाटीक यांची पोलिस मुख्यालयात तर धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई दीपक गुलाबराव पाटील यांची रवानगी पोलिस मुख्यालयात करण्यात आली. तसेच हे तिनही पोलिस कर्मचारी ज्या पोलिस ठाण्यातील आहेत तेथील प्रभारी अधिकारीकडून खुलासा मागविण्यात आलेला आहे.
दरम्यान, महामार्गावर कोणताही पोलिस कर्मचारी वाहनधारकांकडून वसुली करत असल्यास त्याचा व्हिडीओ अथवा फोटो काढून पोलिसांना पाठवावा असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.