धुळे येथे माजी कृषी अधिष्ठात्यांच्या घरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:35 PM2018-05-30T18:35:49+5:302018-05-30T18:35:49+5:30
हवालदार असलेल्या भावाची फिर्याद : धुळे येथील भोई सोसायटीतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या भोई सोसायटीत चोरट्यांनी येथील कृषी महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता यशवंत फुलपगारे यांच्या प्लॉट नं.११ येथील निवासस्थानातून २५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी त्यांचे बंधू हवालदार केशव फुलपगारे यांच्या फिर्यादीनुसार देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
माजी अधिष्ठाता फुलपगारे यांची राहुरी कृषी विद्यापीठात बदली झाली असून ते तेथे गेलेले होते. त्यामुळे घर बंद होते. चोरीची घटना २४ ते २९ मे या दरम्यान घडली असल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी फुलपगारे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. आणि कपाटातील पाच हजार रुपये रोख तसेच चांदीचा ताट, सहा बनारसी साड्या असा एकूण २५ हजारांचा ऐवज लांबविला.
भावाने दिली फिर्याद
चोरीची ही घटना मंगळवारी पहाटे लक्षात आली. फुलपगारे यांचे लहान बंधू केशव फुलपगारे हे आझादनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांनी मंगळवारी सकाळी भावाला घरात चोरी झाल्याचे कळवून स्वत: देवपूर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. तपास पोहेकॉ चिंंचोलीकर तपास करत आहेत.
ओसवाल नगरातही चो-या
भोई सोसायटीच्या पुढे राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे असलेल्या ओसवाल नगरातही चोरीच्या चार-पाच घटना घडल्या असून ते बहुतांश शिक्षक आहेत. मात्र पोलीस फिर्याद घेत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी असल्याची माहिती मिळाली. बुधवारपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.