संस्थेचे शिक्के, लेटरपॅडसह दस्तऐवजाची चोरी; कुसुंबा येथील प्रकार उघड
By देवेंद्र पाठक | Published: January 20, 2024 05:28 PM2024-01-20T17:28:38+5:302024-01-20T17:29:01+5:30
तीन जणांविरोधात गुन्हा.
देवेंद्र पाठक,धुळे : तालुक्यातील कुसुंबा येथील सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशन या संस्थेचे लेटरपॅड, शिक्के आणि महत्त्वाचे दस्ताऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आलेला आहे. १४ जून २०२१ पासून ते आजपर्यंत या वस्तू मिळून आलेल्या नाहीत. यात एका महिलेसह तीन जणांवर संशय व्यक्त केला जात असल्याने शुक्रवारी दुपारी तालुका पोलिस ठाण्यात चोरीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे तालुक्यातील कुसुंंबा येथील अनिल महादू चौधरी यांनी शुक्रवारी दुपारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, कुसुंबा येथे सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशन नावाची संस्था स्थापन करण्यात आली होती; परंतु या संस्थेचे लेटरपॅड, शिक्के आणि महत्त्वाचे दस्ताऐवज मिळून आलेले नाहीत. हा प्रकार १४ जून २०२१ पासून ते आजतागायत घडलेला आहे. अनिल चौधरी आणि संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय या वस्तू नेण्यात आलेल्या आहेत. या मागे संस्थेची बदनामी आणि मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने हा प्रकार असल्याचा अंदाज आहे.
शासकीय कार्यालयाची दिशाभूल करणे, बनावट खोटे पत्र तयार करून खोटी माहिती खरी मानून वापर करण्याची संस्थेची व शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. कागदपत्रांचा बेकायदेशीर उपयोग होऊ शकतो असा अंदाज येताच अनिल चौधरी यांनी धुळे तालुका पोलिस ठाणे गाठत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार, धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील सुरेश महादू चौधरी, रवींद्र महादू चौधरी आणि शोभा रवींद्र चाैधरी (कोणाचेही वय माहिती नाही) या तीन संशयितांविराेधात भादंवि कलम ३७९, ४२०, ४६८, ४७१, ४७६, ४६५, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास धुळे तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.