धुळ्याहून अद्याप मुंबईसाठी अद्यापही बस सुरूच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:21 AM2020-09-08T11:21:57+5:302020-09-08T11:22:18+5:30
पुण्यासाठी दिवसभरात फक्त पाच बसेस
आॅनलाइन लोकमत
धुळे : अनलॉकच्या चौथ्या टप्यात आंतरजिल्हा बससेवा सुरू झालेली आहे. मात्र अजूनही राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसाठी धुळ्यातून एकही बस अद्याप सुरू झालेली नाही. तर पुण्यासाठी दिवसभरात फक्त पाच बसेस आहे. त्यामानाने औरंगाबाद, नाशिकसाठी पुरेशाप्रमाणात बसेस उपलब्ध आहेत.
नाशिक, पुणे हे एस.टी. महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारे मार्ग समजले जातात. अनेक आगाराच्या बसेस याच मार्गावर धावत असतात.
सध्या रेल्वेसेवाही सुरू नाही. त्यामुळे अनलॉकच्या टप्यात आता प्रवाशी महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. मात्र बसेसची अपुर्ण संख्येमुळे त्यांनाही नाईलाजास्तव खाजगी बससेवेकडे वळावे लागत आहे.
आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत पुण्यासाठी फक्त पाच बसेस जात आह. यात अमळनेर आगाराच्या दोन, धुळे आगाराच्या दोन व शिरपूर आगाराच्या एका बसचा समावेश आहे.
दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसाठी अद्यापही बस सुरू झालेली नाही. धुळेच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातूनही मुंबईसाठी बसेस नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या भागातील प्रवाशांना मुंबईला जायाचे असल्यास त्यांना दोन टप्यातच प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान चोपडा आगाराची वाशी बस सुरू असून ती फक्त ठाण्यापर्यंत जाते. तर यावल, रावेर, धुळे, नंदुरबार, अक्कलकुवा येथून कल्याणसाठी बसेस उपलब्ध आहेत. मात्र थेट मुंबईपर्यंत एकही बस नाही. त्यामुळे धुळे आगारातून रात्रीच्यावेळेला मुंबईसाठी एक बस सुरू करावी अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे.
नाशिकसाठी बसेस उपलब्ध
दरम्यान नाशिकला जाण्यासाठी सकाळी ५.३० वाजेपासूनच बसेस उपलब्ध आहेत. त्यामुळे नाशिकला जाण्यासाठी प्रवाशांना तूर्ततरी कुठलीही अडचण भासत नाही. तीच स्थिती औरंगाबादची आहे. या मार्गावरही पुरेशा प्रमाणात बस सुरू असल्याचे धुळे आगारातून सांगण्यात आले.