धुळ्यात चार ठिकाणी ‘शिवभोजन’ सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:56 AM2020-01-23T11:56:46+5:302020-01-23T11:57:16+5:30
२६ रोजी पालकमंत्र्यांच्याहस्ते होणार योजनेचा शुभारंभ
आॅनलाइन लोकमत
धुळे :राज्य शासनाच्या ‘शिवभोजन’ या १० रूपयात जेवण देण्याच्या महत्वाकांक्षी योजनेसाठी शहरातील चार ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहे. २६ जानेवारीपासून ही केंद्रे कार्यान्वित होणार असून, त्याचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्याची महत्वकांक्षी योजना राज्य शासनाने सुरु केली आहे. ही योजना २६ जानेवारी २०२० पासून सुरू होणार आहे.
दरम्यान ही योजना कार्यान्वित करण्यासाठी पुरवठा विभागातर्फे भोजनालय व्यावसायिक, खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टारंट तसेच मेस चालकांकडून १३ जानेवारीपर्यंत अर्ज मागविले होते. यासाठी शहरातून तब्बल ८२ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले होते. त्यातून चार संस्थाची ‘शिवभोजन’साठी निवड करण्यात आलेली आहे.
चार ठिकाणी सुरू होणार
पहिल्या टप्यात शहरातील चार ठिकाणी ही ‘शिवभोजन’केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यात बसस्थानकात दोन, जिल्हा रूग्णालय व कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रत्येकी एक-एक ठिकाणी शिवभोजन योजना सुरू होणार आहे.
ही भोजनालये दुपारी १२ ते २ या कालावधीत कार्यरत राहतील. या कालावधीत योजनेच्यालाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकावर आहे.