घरगुती सिलिंडर गोळा करून त्यांनी चक्क गॅस पंप उभारले; दोन वेगवेगळी कारवाई
By देवेंद्र पाठक | Published: November 2, 2023 03:12 PM2023-11-02T15:12:10+5:302023-11-02T15:12:27+5:30
पोलिसांत गुन्ह्याची नोंद
धुळे : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून अवैध गॅस पंप चालविणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्या विरोधात आझादनगर आणि चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा कलमानुसार दोन वेगवेगळे गुन्हे बुधवारी नोंदविण्यात आले. शहरातील पारोळा रोडवर एक घटना उघडकीस आली.
चारभुजा मार्बलशेजारी असलेल्या श्रीकृष्ण एंटरप्रायजेसच्या आवारात संशयित शाकीर अकील पिंजारी (वय ५२, रा. एकवीरा देवी मंदिराजवळ, धुळे) याने स्वत:जवळ अवैधपणे गॅस सिलिंडरचा साठा करून त्याची वाहनांमध्ये गॅस भरून विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याचे आढळून आले. या ठिकाणी जिल्हा पुरपठा अधिकारी यांनी केलेल्या कारवाईत भरलेले ६ सिलिंडर. इलेक्ट्रिक मोटार, पंप, नोझल, वजन-काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक मायानंद भामरे यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
तर, दुसरी कारवाई चाळीसगाव रोडवरील एका मशिदीजवळ करण्यात आली. या ठिकाणी संशयित इरफान मुसा मन्सुरी (वय ४६, रा. पूर्व हुडको, धुळे) याने बेकायदेशीररीत्या गॅस सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार, वजन-काट्याच्या साह्याने अवैधरीत्या वाहनांमध्ये गॅस भरण्यासह चढ्या भावात विक्री करण्यासाठी गॅस सिलिंडर स्वत:जवळ बाळगल्याचे आढळून आले.
या कारवाईत २० हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी अविनाश वाघ यांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक धीरज महाजन करीत आहेत.