कालीपिली वाहनात चोरट्यांची हातसफाई; महिलेचे दागिने लांबविले
By देवेंद्र पाठक | Published: August 19, 2023 05:52 PM2023-08-19T17:52:03+5:302023-08-19T17:54:20+5:30
मुकटीकडे जाणाऱ्या महिलेचे दागिने लांबविले
धुळे : धुळ्याहून मुकटीकडे जाणाऱ्या कालीपिली वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगमधून ३० हजार रुपये रोख आणि ४० हजारांचे दागिने असा ऐवज शिताफीने चोरून घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबारा ते सव्वा वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला.
सुरेखा गल्लूदास पाटील (वय ५२, रा. कोर्ट सोसायटी, नकाणे रोड, धुळे) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सुरेखा पाटील या मुकटी गावाकडे जाण्यासाठी धुळ्यातील प्रकाश टॉकीजजवळील स्टॉपजवळ दाखल झाल्या. पारोळाकडे जाणाऱ्या एका कालीपिली प्रवासी वाहनात त्या मुकटी गावाकडे जाण्यासाठी निघाल्या. मुकटी गावात पोहचल्यानंतर त्यांनी स्वत: जवळील बॅग तपासली. त्यात ठेवलेले ४० हजार रुपये किमतीची ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मुलाचे दागिने, ३० हजार रुपये रोख असा एकूण ७० हजारांचा ऐवज शिताफीने लांबविला. हा प्रकार लक्षात येताच चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. चोरीच्या या घटनेनंतर घरात चर्चा करून सुरेखा पाटील या महिलेने शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता धुळे तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक याेगेश पाटील घटनेचा तपास करीत आहेत.