किराणा दुकानदाराच्या घरी चोरांची हातसफाई; देवपुरातील घटना, ४३ हजारांचा ऐवज लांबविला
By देवेंद्र पाठक | Published: June 9, 2024 04:57 PM2024-06-09T16:57:11+5:302024-06-09T16:57:55+5:30
याप्रकरणी शनिवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. रवींद्र वसंत अमृतकर (वय ५०, माध्यमिक शिक्षक काॅलनी) यांचा किराणा व्यवसाय आहे.
धुळे : किराणा दुकानदाराच्या घराच्या दरवाजाची जाळी ताेडून आतमध्ये हात टाकून कडी उघडत चोरट्याने आत प्रवेश केला. शोधाशोध करून दागिने आणि मोबाइल असा ४३ हजारांचा ऐवज चोरट्याने लांबविला. ही घटना बुधवारी पहाटे देवपुरातील माध्यमिक शिक्षक कॉलनीत घडली.
याप्रकरणी शनिवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. रवींद्र वसंत अमृतकर (वय ५०, माध्यमिक शिक्षक काॅलनी) यांचा किराणा व्यवसाय आहे. ते बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. ही संधी चोरट्याने साधली. त्यांच्या घराचा दरवाजाची लोखंडी जाळी कशाच्या तरी सहाय्याने तोडली. आतमध्ये हात टाकून आतून बंद असलेल्या दरवाजाची कडी उघडली. घरात प्रवेश करून बेडरूमधील लाकडी कपाट फोडले. शोधाशोध करून ३९ हजार रुपये किमतीचे दागिने आणि ४ हजाराचा मोबाइल असा एकूण ४३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेण्यात आला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
बाहेरगावाहून अमृतकर परिवार परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पाेलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोहेकॉ. मनोज पाटील करीत आहेत.