‘आरटीई’ची तिसरी प्रवेश सोडत तूर्त थांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:12 PM2018-05-19T12:12:24+5:302018-05-19T12:12:24+5:30
धुळे जिल्ह्यात दोन फेºयांमध्ये ६४९ विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश
आॅनलाइन लोकमत
धुळे : आरटीई अंतर्गत वंचीत व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. त्यानुसार आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेºया पूर्ण झाल्या. मात्र तिसºया फेरीची प्रवेश प्रक्रिया संचालकांनी तूर्त थांबवलेली आहे. पुढील सूचना आल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
आरटीई अंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील ९३ शाळांमध्ये १ हजार १८१ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता ९३ शाळांमधील १ हजार १८१ जागांसाठी एकूण १ हजार ४६५ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते.
प्राप्त झालेल्या अर्जांमधून पहिली आॅनलाईन सोडत १२ मार्च रोजी सोडत काढण्यात आली. त्यात ५६८ विद्यार्थ्यांची लॉटरी लागली होती. पालकांनी १४ ते २४ मार्च दरम्यान शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश घ्यायचा होता. मात्र दिलेल्या कालावधीत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे पहिल्यांदा ४ एप्रिल, त्यानंतर १० एप्रिल, १३ एप्रिल अशी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. पहिल्या फेरीचे केवळ ४४१ विद्यार्थ्यांचे प्रवेशच होऊ शकले आहे. यापैकी ५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश तांत्रिक कारणांवरून रद्द करण्यात आले. तर ७४ विद्यार्थ्यांचे पालक शाळांपर्यंत पोहचलेच नाहीत. त्यामुळे १२७ प्रवेश होऊ शकले नाही. शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार मोफत प्रवेशाची दुसरी लॉटरी २८ ते ३० मार्च दरम्यान काढण्यात येणार होती. मात्र पहिल्या सोडतीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने, नियोजन कोलमडले. त्यानंतर शिक्षण विभागातर्फे दुसरी सोडत काढण्यात आली. त्यात ३०५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र पहिल्या फेरी प्रमाणेच दुसºया फेरीच्यावेळीही दोनवेळा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. मात्र दुसºया फेरीचेही २०८ प्रवेश झाले. दुसºया फेरीचेही ९७ प्रवेश पूर्ण झालेले नाही. पहिल्या दोन फेरीचे २२४ प्रवेश पूर्ण झालेले नाही.
दरम्यान शासनाने आता आपल्या धोरणात बदल केलेले आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेतून २०१८-१९ या वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी अर्ज न केलेल्या प्रवर्गातील पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. या पालकांना अर्ज भरता यावा यासाठी,प्रवेश प्रक्रियेत आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना नॅशनल इन्फॉर्मेटीक्स सेंटरला (एनआयसी) दिल्या आहेत. तसेच सात दिवस प्रवेश प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुन्हा ही सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राखीव जागेसाठी पालकांच्या उत्पनाची अट नाही
राखीव जागेसाठी पालकांच्या उत्पन्नाची अट नाही
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खाजगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गाबरोबरच आता विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, आणि इतर मागासवर्ग, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पालकांच्या उत्पन्नाची अट लागू होणार नाही. तसेच एचआयव्ही बाधित मुलांनाही उत्पन्नाच्या अटीतून मुक्त करण्यात आल्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या निर्णयानंतर संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना चालू प्रक्रियेत नव्याने,प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत हजारो मुलांना त्याचा लाभ होणार आहे.
नवीन धोरणानुसार आतापर्यंत वाटप झालेल्या प्रवेशाच्या जागा सोडून इतर रिक्त जागांसाठी सुधारित व्याख्येप्रमाणे अर्ज मागविण्यात यावेत. याकरिता एन.आय.सी.पुणे यांनी आवश्यक ते बदल आॅनलाईन प्रणालीमध्ये तत्काळ करावेत अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच या पूर्वी ज्या बालकांना / पालकांना सदर योजनेचा फॉर्म भरता आला नाही, त्यांनाही आॅनलाइन प्रणालीमध्ये फॉर्म भरता येईल.