पिण्याच्या पाण्यासाठी तिसगावला पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 09:34 PM2019-05-06T21:34:32+5:302019-05-06T21:35:56+5:30
गुरांच्या पाण्यासाठी विकतचा टॅँकर : दोन कि.मी. अंतरावरून महिला आणतात हंडा-कळशीतून पाणी
प्रदीप पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिसगाव ढंढाणे : गेल्या वर्षी पुरेशा पावसाअभावी येथील परिसरात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. तर गुरांसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून रोज टॅँकरने पाणी मागवावे लागते, अशी कैफीयत पशुपालक व्यक्त करत आहेत. मार्च महिन्यापासून ही परिस्थिती निर्माण झाली असून दिवसेंदिवस परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
नगाव ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत तिसगाव हे सुमारे हजार-अकराशे लोकवस्तीचे गाव असून तेथे सर्व धर्म व समाजाची कुटुंबे आहेत. लहान-मोठी १८५ घरे तसेच अतिक्रमित शे-सव्वाशे घरांची लोकवस्ती आहे. त्यांच्यासाठी ७० ते ८० नळकनेक्शन देण्यात आले आहेत. त्यापैकी अर्धे तिसगाव व संपूर्ण आदिवासी, दलित वस्तीत सध्या पाणी पुरवठा केला जात आहे. बाकी उर्वरीत अर्धे गाव खाजगी विहिरीवरून पाणी भरतात. त्यासाठी स्वखर्चाने वीज पंपाद्वारे आपापल्या घरी पाणी नेतात. सध्या तीव्र उन्हामुळे विहिरीची पातळी खोल गेली असून एकाचवेळी सर्वांना पाणी मिळत नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वांना वीज पंप सुरू करून पाणी भरावे लागते. त्यामुळे दिवस-रात्र कोणाला तरी वीज पंप सुरूच ठेवावे लागतात. तेव्हा कुठे पिण्यापुरते पाणी उपलब्ध होते.
दुधाळ जनावरांसाठी पशुपालक शेतकऱ्यांकडून प्रयत्न
ग्रामस्थांसोबत जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. कोणाकडूनही प्रयत्न होत नसल्याचे पाहून दुग्धोत्पादन व्यवसाय करणाºया शेतकऱ्यांनी आपापल्या दुधाळ जनावरांसाठी टॅँकर मागवून पाण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येकाला त्यासाठी वेगळी तजवीज करावी लागत असून त्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत. कोणी टॅँकरने पाणी आणतो, कुणी बैलगाडीद्वारे टाक्यांमधून पाणी आणतो. लहान-मोठ्या जनावरांची संख्या सुमारे हजार-बाराशेपर्यंत आहे. एवढ्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था हवी, अशी अपेक्षा व्यक्त होते.
गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर टकाºया वस्ती असून तेथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. सध्या तेथे चार दिवसाआड पाणी मिळते. ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी वादाचे प्रसंग ओढवतात.
बंधाºयांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष
गावाजवळून वाहणाºया भात नदीवरील दोन बंधारे नादुरुस्त असल्याने त्यात पाणीसाठा होत नाही. जि.प.लघुसिंचन विभागाकडे पाठपुरावा करूनही हा विभाग दुरुस्ती करत नसल्यानेही ग्रामस्थांमध्ये संताप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे बंधारे आहे त्याच स्थितीत आहेत. त्यांची दुरुस्ती झाल्यास गावासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच परिसरातील विहिरींची पातळीही वाढणार आहे.