त्या सात जणांनी कोरोनाला हरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:48 PM2020-05-06T21:48:24+5:302020-05-06T21:50:21+5:30
महापालिका : बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या अकरावर पोहचली, १८ रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू
धुळे : कोरोना विषाणूवर मात करीत धुळे जिल्ह्यातील आणखी सात रुग्ण बुधवारी सायंकाळी आपापल्या घरी परतले. ते सर्व धुळे शहरातील आहेत. त्यात एका वर्षाच्या बाळासह ११ वषार्ची मुलगी, ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. यामुळे कोरोना विषाणूच्या आजारातून बरे होवून घरी जाणाºया रुग्णांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे डेडिकेटड कोविड हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत ३१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागात, तर उर्वरित १८ रुग्णांवर कोविड केअर सेंटरमधील सर्वसाधारण वॉर्डात उपचार सुरू आहेत.
या विभागात दाखल सात रुग्णांना १४ दिवस पूर्ण झाले. या कालावधीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांची काल व आज कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे अहवाल आज निगेटिव्ह आले. त्यामुळे या सात जणांना आज सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. अरुण मोरे, डॉ. अनंत बोर्डे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. परवेज मुजावर, डॉ. रामानंद, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावळे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, महसूल, बंदरे, खार विकास जमिनी, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज आणखी सात रुग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतले आहेत. असे असले तरी नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. शारीरिक अंतर ठेवावे. नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे. अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधीक्षक पंडित यांनी केले आहे. आप की वजह से आज हम घर पर जा रहे. आप की वजह से आज का दिन देखनो को मिला, आपने अच्छी सेवा दी, अशा शब्दात कोरोना विषाणूच्या आजारातून बरया झालेल्या महिलेने आपल्या भावना व्यक्त करीत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांबद्दल गौरवोद्गार काढले.