धुळ्यात नवस फेडण्यासाठी भाविकांची उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 09:33 PM2019-04-18T21:33:31+5:302019-04-18T21:33:49+5:30
एकवीरा देवी मंदिर : बाहेरील राज्यातील भाविक धुळ्यात दाखल; आदिशक्तीची आज पालखी मिरवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरादेवी यात्रोत्सवास गुरुवारी थाटात प्रारंभ झाला. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी दिवसभरात १ हजार ३०५ मुलांचे जाऊळ काढण्यात आल्याची माहिती एकवीरा मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ तसेच मंदिरात भाविकांनी गर्दी केल्यामुळे मंदिर परिसर फुलला होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एकवीरा देवीची पालखी मिरवणूक मंदिर परिसरातून काढण्यात येणार आहे.
चैत्र महिन्यातील चावदसच्या दिवशी कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिरात जाऊळ काढण्याची परंपरा आहे. यंदाही लहान मुलांचे जाऊळ काढण्यासाठी धुळे जिल्ह्यासह नाशिक, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, मुंबई, पुणे तसेच राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ राज्यातील भाविक गुरुवारी मंदिरात दाखल झाले होते. मंदिरात सकाळी एकवीरादेवीची महापूजा व आरती मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या हस्ते झाली. मंदिराच्या गाभाºयात आदिशक्ती एकवीरादेवीला नैवेद्य दाखविण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
दुकाने थाटली दुकाने
एकवीरादेवी मंदिर ते पंचवटीपर्यंत विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत़ या दुकानांच्या मागे पांझरा नदी पात्रात बच्चे कंपनीसाठी आकर्षण ठरणारे पाळणे व मनोरंजनाची साधनेही दाखल झाली आहेत. यात्रोसवास गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. एकवीरादेवी मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिराच्या चारही बाजुंनी दरवाजे आहेत. परंतु, यात्रोत्सवाच्यानिमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी गुरुवारी सकाळपासूनच झाल्यामुळे भाविकांना केवळ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश देण्यात येत होता़ तसेच दर्शन घेऊन येणाºया भाविकांना मंदिराच्या उजव्या बाजूकडील दरवाजातून बाहेर सोडण्यात येत होते. भाविकांनी मंदिरात गोंधळ घालू नये; म्हणून केवळ दोनच दरवाजे आज दिवसभर सुरू होती. नवस फेडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम होती.
१६ सीसीटीव्ही कॅमेरे
यात्रोत्सवात येणाºया भाविकांची लुबाडणूक होऊ नये, पाकीट चोरी किंवा महिलांचे अलंकार गहाळ होऊ नये, अथवा कुठे छेडखानीचे प्रकार होऊ नये यासाठी म्हणून मंदिरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्व सीसीटीव्ही कॅमेºयांचे नियंत्रण हे मंदिरात आहे़ तसेच सुरक्षितता रहावी यासाठी मंदिरालगत पोलिसांची राऊटी अर्थात लहान आकाराची झोपडी देखील उभारण्यात आली आहे़
जड वाहनांना प्रवेश बंदी
नेहरू चौक (जुना आग्रारोड) मुख्य प्रवेशद्वार ते एकवीरा देवी मंदिरापर्यंतचा रस्ता, जुने धुळे नवीन पूल ते एकवीरा देवी मंदिरापर्यंतचा रस्ता, पंचवटी महादेव मंदिरपर्यंतच्या रस्त्यावर वाहनांना यात्रोत्सवाच्या कालावधित प्रवेश बंदी घातली आहे. वाहनधारकांनी सहकार्य करावे़
पारंपारीक मार्गावरुन आज निघणार मिरवणूक
यात्रोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार १९ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता एकवीरादेवीची पालखी मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीची सुरुवात मंदिरापासूनच होईल. पारंपरिक मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात येईल़
कुलस्वामिनी एकवीरादेवीचा यात्रोत्सव अक्षय्य तृतीयेपर्यंत सुरू राहील. यानिमित्ताने यात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्यावतीने केले़