तुझ्यासह ट्रॅक्टर खड्ड्यात टाकेन; कोतवालला धमकी
By देवेंद्र पाठक | Published: December 14, 2023 06:53 PM2023-12-14T18:53:48+5:302023-12-14T18:53:58+5:30
सोनगीर पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा.
धुळे : मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडल्यानंतर ट्रॅक्टर मालकासह दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. कोतवालला पथकापासून दूर नेत धमकी देत ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी सोनगीर पोलिसात बुधवारी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे तालुक्यातील सैताळे ते लामकानी रस्त्यालगत असलेल्या सरकारी गटाजवळ महसूलच्या पथकाने मंगळवारी दुपारी माती वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला पकडले. चालकाकडे गौणखनिज वाहतुकीचा परवाना विचारला असता तो मिळून आला नाही. त्यामुळे चालकास ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. तेव्हा ट्रॅक्टरचा मालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या एक जण घटनास्थळी आले. त्याच्या नातेवाइकास ट्रॅक्टर ट्रॉली मातीसह हायड्रोलिक करून पथकातील कोतवाल नरेश बाबुराव माळी (वय २५ रा. लामकानी, ता. धुळे) यास पथकापासून दूर नेत तु ट्रॅक्टरवरून उतरला नाही तर ट्रॅक्टर तुझ्यासह खड्ड्यात टाकून देईल, असा दम देत ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी फरार झालेल्या ट्रॅक्टर मालकासह दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गिरासे करीत आहेत.