ग्रामसभेतच दिली सरपंचाला ठार मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:05 PM2020-01-27T22:05:11+5:302020-01-27T22:05:32+5:30
रतनपुरा : चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
धुळे : गावातील कामे केली नाही या कारणावरुन तालुक्यातील रतनपुरा (बोरकुंड) येथील ग्रामसभेत चौघांनी तोडफोड करत महिला सरपंचाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर ग्रामसेवकाला धमकी दिल्याची धक्कादायक घटना २६ जानेवारी रोजी घडली. याप्रकारामुळे गावात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे तालुक्यातील रतनपुरा (बोरकुंड) प्रजासत्ताक दिनानिमित्त दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यात विविध विषयांवर चर्चा सुरू होती. तेव्हा गावातील कामे का केली नाही हा मुद्दा पुढे संशयित आरोपींनी गोंधळ घातला. मोठमोठ्या आरडा-ओरड करीत त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले़ याठिकाणी असलेल्या टेबलावरील काच फोडण्यात आला़ तर, तुम्ही आमच्या गावात राहतात कसे? असा दम ग्रामसेवकाला देण्यात आला़ महिला सरपंच यांनाही जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली़
याप्रकरणी सरपंच पुनम चौधरी यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार, रामलाल चिंधा माळी, भटू तुळशिराम माळी, गोकूळ भटू माळी, रोहिदास रामदास माळी या चारही संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़