पतीसह तिघा आरोपींना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:52 PM2019-06-21T22:52:09+5:302019-06-21T22:52:56+5:30
विटाई विवाहिता खून प्रकरण : आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी; नातेवाईक, ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी
पिंंपळनेर : विटाई ता.साक्री येथील किरणबाई खैरनार यांचा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी त्यांचे पती शिवाजी खैरनार, दीर माधव खैरनार व दादाजी खैरनार यांना शुक्रवारी साक्री न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान मयत किरणबाई खैरनार यांची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीसह दिरांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आमखेल येथील त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक व तहसीलदार यांना त्या संदर्भात निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. १७ जून रोजी सकाळी आमखेल येथील माहेरवासीण किरणबाई खैरनार यांची विटाई, ता. साक्री येथील घरात पती शिवाजी पुंजाराम खैरनार, दीर माधव पुंजाराम खैरनार व दादाजी पुंजाराम खैरनार यांनी संगनमत करून घरातच किरणबाई यांचा अत्यंत निर्घृणपणे खून केला होता. या दुर्दैवी घटनेसंदर्भात त्यांच्या माहेरी आमखेल येथे शोककळा पसरली होती. आजही हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती व दोघा दिरांना अटक केली आहे.
आरोपींच्या फाशीची मागणी
शुक्रवारी विटाई येथे किरणबाई खैरनार यांचा गंधमुक्ती व उत्तरकार्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आमखेल येथील ग्रामस्थ व नातेवाईक यांनी ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर लिहिलेल्या मागण्यांचे निवेदन देऊन तिघा आरोपींविरोधातील खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) कोर्टात चालवावा, सरकारी वकील म्हणून अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे.
पोलीस उपाधीक्षक देविदास ढुमणे यांना निवेदन देताना आमखेलचे उपसरपंच ज्ञानेश्वर पवार, बहीण कल्पना प्रकाश देवरे व नितीन बेडसे यांनी घटनेचे गांभीर्य सांगत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या साठी साकडे घातले. आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन ढुमणेंनी दिले. नातेवाईक व ग्रामस्थांनी तहसीलदार संदीप भोसले यांनाही निवेदन देत वरिष्ठ स्तरावर पाठवून न्याय मिळवून देण्याची मागणी आमखेल येथील मोरे, पवार, नांद्रे, ठाकरे परिवारांसह ग्रामस्थ व नातेवाईकांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने आप्तेष्ट व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी पती शिवाजी खैरनार, माधव खैरनार, व दादाजी खैरनार यांना शुक्रवारी साक्री न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यामुळे त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.