मेणबत्ती कारखाना आग प्रकरणी कारखान्याच्या मालकिणीसह तिघांना अटक, मृतांची संख्या झाली पाच
By अतुल जोशी | Published: April 19, 2023 05:31 PM2023-04-19T17:31:43+5:302023-04-19T17:32:19+5:30
मृतांच्या नातेवाइकांना मदत जाहीर.
धुळे : साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारात चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आग प्रकरणी पोलिसांनी चौघांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, कारखान्याच्या मालकिणीसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे. तर एकजण फरार झालेला आहे. या घटनेत मृतांची संख्या पाच झालेली आहे. मृतांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वासखेडी शिवारात मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्यात मंगळवारी दुपारी स्फोट झाल्याने तीन महिलांसह एका मुलीचा होरपळून मृत्यू झाला होता. तर दोन महिला जखमी झाल्या होत्या. जखमींना नंदुरबार येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना संगीता प्रमोद चव्हाण (वय ४२, रा. जैताणे) यांचा मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या स्फोटप्रकरणी मृतांची संख्या पाच झाली आहे. चौघा मृतांवर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान या घटनेप्रकरणी भैय्या सुरेश भागवत (वय ३६, रा.जैताणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिसांत भवानी सेलिब्रेशन वर्कशॅापच्या मालकीण रोहिणी जगन्नाथ कुवर (वय ३६, रा. वासखेडी), सुपरवायझर जगन्नाथ रघुनाथ कुंवर (वय ६४, रा. वासखेडी), अरविंद जाधव (वय २५) व अन्य एकजण अशा चौघांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी रोहिणी कुवर, जगन्नाथ कुवर, अरविंद जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तपास एपीआय हनुमंत गायकवाड करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.