लामकानीत एकाच रात्री तीन घरे फोडली; सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल
By देवेंद्र पाठक | Published: May 20, 2023 06:36 PM2023-05-20T18:36:32+5:302023-05-20T18:37:49+5:30
गावात भीतीचे वातावरण.
देवेंद्र पाठक, धुळे: तालुक्यातील लामकानी गावात एकाच रात्री तीन ठिकाणी चाेरट्यांनी हातसफाई करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली असून, सोनगीर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या धाडशी घरफोडीमुळे गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
धुळे तालुक्यातील लामकानी येथील भाजी व्यावसायिक रूपचंद सुरीतराम पाटील यांचे बंद घर चोरट्याने फोडले. त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेली १४ लाखांची रोकड चाेरट्याने शिताफीने लांबविली, तसेच चोरट्याने गावातीलच देविदास गोकुळ पाटील, कन्हैय्यालाल सीताराम पाटील यांच्या घरावरही डल्ला मारला. दोन्ही घरफोड्यांत सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. त्यात ४ हजार रुपयांच्या रोकडसह ७९ हजार ३०० रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात भादंवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र महाले घटनेचा तपास करीत आहेत.
गावात परसरले भीतीचे वातावरण
गेल्या काही दिवसांपासून सोनगीर हद्दीमध्ये चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातलेला आहे. लामकानी गावात एकाच वेळी एकाच रात्री तीन घरांत डल्ला मारल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.