धुळे उपनिबंधकासह तीन जखमी, चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:04 PM2018-01-30T19:04:24+5:302018-01-30T19:05:32+5:30
गोराणे फाटा : कंटेनर अपघात, कार चक्काचूर
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भरधाव वेगाने येणाºया कंटेनरने कारला जोरदार धडक दिली़ या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य एक जण असे तीन अधिकारी जखमी झाले़ कार चालक मात्र जागेवरच गतप्राण झाला़ जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ रुग्णालयाबाहेर हितचिंतकांनी गर्दी केली होती़
शिंदखेडा येथील देखरेख संघाच्या हॉलमध्ये कर्जमाफी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत जिल्हा उपनिबंधक जे़ के़ ठाकूर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी, जिल्हा विशेष लेखा परिक्षक पी़ एस़ पाटील यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटी, बँक, लेखा विभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय अशा विविध विभागातील अधिकाºयांची बैठक होती़ बैठकीचे कामकाज आटोपल्यानंतर एमएच १८ बीसी ७८९२ क्रमांकाच्या कारने ठाकूर, चौधरी आणि पाटील हे तिघे धुळ्याकडे रवाना झाले़ दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास त्यांची कार गोराणे ता़ शिंदखेडा येथील फाट्यावर आली़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक करण्यात आली आहे़ त्यावेळेस कार महामार्गावर आली असता समोरुन एमएच १५ डीके १७७३ क्रमांकाच्या कंटेनरने जोरदार धडक दिली़ ही धडक इतकी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाल्याने चालक भटू बागूल (रा़ वाडीभोकर ता़ धुळे) हा गंभीर जखमी झाल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाला़ अपघाताची ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली़
योगायोगाने अपघात स्थळापासून जवळच रुग्णवाहिका असल्याने जखमींना तातडीने धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ कंटेनर चालक घटनास्थळावरुन ट्रक सोडून पळून गेला़